सांगली : सांगलीतील दुधगावचे शहीद जवान नितीन सुभाष कोळी यांचे स्वप्न साकार झाले आहे. आपल्या पत्नीने शिक्षिका व्हावे, हे कोळी यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे. वीरपत्नी संपत्ती कोळी  दुधगावमधील दादासाहेब आडमुठे कन्या विद्यालयात शिक्षिका म्हणून रुजू झाल्या आहेत.


ऐन दिवाळीत आपल्या पतीचे निधन झाल्याने धाय मोकलून रडलेल्या शहीद नितीन कोळी यांच्या पत्नी आज मात्र मोठया धीराने सावरल्या आहेत. अवघ्या महिन्याभरात आपल्या पतीच्या निधनाचे दुःख बाजुला सारुन त्यांनी घराची आणि मुलाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.

दुधगावातील दादासाहेब आडमुठे कन्या विद्यालयात त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या आहेत. या कुटुंबाकडे स्वत:ची एक गुंठाही जमीन नाही. त्यामुळे या नोकरीच्या माध्यमातून आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करुन त्यालाही देशासाठी धाडून हा देशसेवेचा वारसा मी पुढे चालवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

मला आणखी एक मुलगा असता तर तोही देशासाठी अर्पण केला असता, असे गौरवोद्गार काढणाऱ्या नितीनच्या वडिलांनी आपल्या मुलाची इच्छा पूर्ण झाल्याबदल समाधान व्यक्त केले आहेत, त्याचप्रमाणे लेकाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे आभारही मानले आहेत.

शहीद नितीन कोळी यांना परिस्थितीमुळे बारावीनंतर शिक्षण घेता आलं नव्हतं. तरीही त्यांनी सीमा सुरक्षा दलात सेवा बजावत असतानाच अगदी जिद्दीने आपल्या पत्नीला एमए, बीएडपर्यंतचे शिक्षण दिले. अर्थात हे स्वप्न साकार होताना पाहण्यासाठी ते हयात नाहीत. मात्र नितीन यांचं स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच त्या संपूर्ण घराची जबाबदारी समर्थपणे उचलू शकत आहेत.

संबंधित बातम्या


वारणेच्या काठी शहीद नितीन कोळींना अखेरचा सलाम