पंढरपूर : विवाह नोंदणी संस्थांमार्फत लग्नाळू तरुणांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पंढरपूर येथील काही तरुणांनी लग्नासाठी एका विवाह नोंदणी संस्थेत आपलं नाव नोंदवले. सुंदर मुलींचे फोटो आणि फोन नंबर देखील त्यांना पाठवण्यात आले. फोनवर बोलत भावी सुंदर आयुष्याची स्वप्ने हे तरुण रंगवत होते. अशाच बेसावध क्षणी लग्न खरेदीसाठी खात्यावर फोन पे मधून ऑनलाईन हजारो रुपये टाकायला लावले. विवाह मुहूर्त जवळ येताच या तरुणांना खरा दणका बसला. मात्र, जेव्हा मुलींनी आणि संस्थेने फोन उचलणे बंद केल्यावर आपली फसगत झाल्याचे कळले तोपर्यंत उशीर झाला होता.


हाती नवरीही नाही आणि गाठीचा पैसाही गेल्यावर हे तरुण घाबरून गेले. मग सुरु झाली ती संस्था त्यांचे मध्यस्थी याना शोधाशोध आणि शेवटी भीतभीत पोलीस ठाण्याची पायरी चढायची पाळी आली. अशा पद्धतीची फसवणूक झाल्याच्या घटना अनेकवेळा समोर येतात. मात्र, पंढरपूर तालुक्यातील एका गावातील तरुणाला या संस्थेने लक्ष केले आणि त्याच्याकडून अनेक तरुणांना लग्नासाठी भुरळ पाडत जवळपास 6 लाख 66 हजारांना चुना लावला आहे. यात इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, नगर, चडचण अशा ठिकाणचे जवळपास 21 नवरदेवांची माहिती समोर आली आहे.


मुंबईतील नवरी मिळे नवऱ्याला या विवाह संस्थेने पंढरपूर परिसरातील अनेक तरुणांना असा लाखो रुपयांचा गंडा घालून त्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावातील शहाजी शिवाजी शिंदे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.


'नवरी मिळे नवऱ्याला' संस्थेकडून फसवणूक
मुंबई येथील नवरी मिळे नवऱ्याला या विवाह जुळवून देणाऱ्या विवाह संस्थेतील राज पाटील आणि सचिन बनसोडे यांची पंढरपुरातील शहाजी शिंदे यांची सोशल मीडियातून ओळख झाली. यातून राजन पाटील यांनी सुस्ते गावातील शिवाजी शिंदे यांना पैशाचे आणि नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विवाह इच्छुक तरुणांकडून पैसे घेवून नोंदणी करण्यास सांगितले. त्यानुसार शहाजी शिंदे यांनी गावातीलच विवाह इच्छुक असलेल्या शाम शिंदे यांना माहिती देवून त्यांचेही या विवाह संस्थेत विवाहसाठी नाव नोंदणी केली. हे विवाह आंतरजातीय असतील तर त्यांना शासनाकडून 80 हजार व त्याच जातीतील असतील तर 50 हजार रुपये मिळणार असल्याचेही पाटील यांनी सांगितल्याने त्यांचे काम करायला तयार झालेल्या शहाजी शिंदे यांनी नावे नोंदवायला सुरुवात केली.


सुंदर मुलींचे फोटो आणि मोबाईल नंबर भावी नवदेवांना पाठवायचे..


नाव नोंदणीनंतर लग्नासाठी तयार असलेल्या सुंदर मुलींचे फोटो आणि मोबाईल नंबर या भावी नवरदेवांना देण्यात आले. कोणाला कोल्हापूरची मुलगी आहे असे सांगितले तर कोणाला नगरची असे सांगितले. मोबाईवरुन शाम शिंदे यांनी त्या मुलीशी बोलणे सुरु केले. सुंदर मुलींचे दिलेले फोटोही सोशल मीडियातून काढून दिले असण्याची शक्यता पोलीस व्यक्त करीत आहेत. दरम्यान लग्नासाठी लागणारे साहित्य, कपडे, सोने आदी साहित्य खरेदी करण्याासाठी पैशाची मागणी केली. त्यानुसार शाम शिंदे यांनी त्यांचे व त्यांच्या इतर विवाहासाठी नोंदणी केलेल्या चार मित्रांचे मिळून दोन लाख रुपये राजन पाटील यांच्या नावे फोन पे वरुन ट्रान्सफर केले.


पैसे पाठवल्यानंतर फोन बंद..
पैसे मिळाल्यानंतर विवाह नोंदणी संस्थेकडून नोव्हेंबर महिन्यात विवाहाची तारीख देण्यात आली. विवाहाची तारीख उलटून गेल्यानंतर संबंधीत विवाह संस्थेकडे व राजन पाटील यांच्याकडे फोन वरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतरही त्यांनी संबंधीत संस्थेकडे वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुन अद्याप संपर्क झाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहाजी शिंदे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे.


अजूनही येतात मुलींचे फोन
आता पोलिसांनी या मध्यस्थांसह मुंबई येथील नवरी मिळे नवऱ्याला या संस्थेची माहिती मिळवण्यास सुरुवात केली असल्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील तरुणांची लग्ने लवकर होत नाहीत असे चित्र या संस्थेकडून या तरुणांसमोर उभे केले आणि यातूनच असे फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. नवरी मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या या ठकांनी थेट फोन पे मधून ऑनलाईन पैसे घेऊन गंडा घातला असून या संस्थेकडून फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे अजूनही अशाच पद्धतीचे फोन या तरुणांना येत असून बिनधास्तपणे बोलणाऱ्या तरुणी लग्नासाठी नावे नोंदवायला सांगत आहेत.


संबंधित बातमी : 


बनावट विवाह करून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या वधूस जळगाव पोलिसांची अटक