Marathwada Rain Update: मराठवाड्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं असून बीड, लातूर, नांदेडसह अनेक जिल्ह्यांत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले तुडुंब भरल्याने रस्ते बंद झाले, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे, तर बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि सैन्यदलाची मदत घेण्यात येत आहे. 

Continues below advertisement


मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झालाय. यामध्ये एका दिवसात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे .एक जण जखमी झाला आहे. तर अनेकांना पुरामुळे स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे. खास करून नांदेड आणि लातूर या ठिकाणी अनेक लोकांना स्थलांतरित करण्यात आले. एसडीआरएफची दोन पथक नांदेडमध्ये बचाव कार्य करत आहेत .तर लातूरमध्ये स्थानिक पथक बचाव कार्य करत आहे .काल झालेल्या पावसामध्ये हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालंय .जवळपास सव्वाशे जनावर दगावली आहेत..


बीड : कार वाहून गेली, एक बेपत्ता


बीड जिल्ह्यातील परळी वैजापूर तालुक्यातील कौडगाव हुडा शिवारातील तेलेसमुख रोडवर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने बलेनो कार वाहून गेली. या कारमध्ये चार जण प्रवास करत होते. मध्यरात्री स्थानिक प्रशासनाने शोध घेतला असता तिघांना सुखरूप वाचवण्यात आलं, मात्र एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. या शोधमोहीमेसाठी पुण्यातून एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल होत आहे.


 लातूर : गावांचा संपर्क तुटला, 210 नागरिक स्थलांतरित


लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील मौजे बोरगाव व धडकनाळ या गावांचा पावसामुळे संपर्क तुटला आहे. पाण्याने वेढलेल्या गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. आतापर्यंत 70 कुटुंबे म्हणजेच 210 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून सतत मदतकार्य सुरू आहे.


कर्नाटकमधूनही मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने परिस्थिती गंभीर


नांदेड लेह धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने लडो नदीला पूर आला आहे. कर्नाटकमधूनही मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. परिणामी पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, भिगेली व हसना या गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.


रावनगाव भागात 225 नागरिक प्रतिकूल परिस्थितीत अडकले असून बचावकार्य सुरू आहे.
* मस्जिद भागात 4-5 नागरिक, तर हसना येथे 7-8 नागरिक अडकले असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
* भासवाडीतील 20 व भिगेलीतील 40 नागरिक सुरक्षित करण्यात आले आहेत. या भागात बचाव कार्यासाठी सैन्यदलाची मदत घेण्यात आली आहे.


 देगलूर व हदगाव : रस्ते बंद


देगलूर तालुक्यातील होसणी परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून लंडी नदीला पूर आला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने बाहेरगावच्या रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली आहे. तुपरशाळगाव पुलावर पूर्णपणे वाहतूक बंद आहे.हदगाव तालुक्यातील शिकार येथील पैनगंगा नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. बाभळी गावच्या शिवारात पाणी शिरल्याने रस्ता बंद झाला आहे. सुदैवाने येथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे व सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. एनडीआरएफ, स्थानिक पोलीस, महसूल व सैन्यदल सतत बचाव कार्यात गुंतले आहेत.