Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि इतर मंत्री आज (24 सप्टेंबर) मराठवाडा भागातील पूरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडात पावसाने प्रचंड हाहाकार माजवला असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि घरे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर, धाराशिव, बीड आणि परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. परभणीच्या पाथरी भागात रात्रीतून पाणी साचले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अभूतपूर्व पावसामुळे मराठवाडा भागातील धरणे भरली आहेत. आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मराठवाडा भागातील धाराशिवमध्ये 33 हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. या अतोनात नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना 2200 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या मदतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. 

Continues below advertisement

बेडरूमची गादी आणि सोफा 20 लाखाचा आणि..

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांनी 2200 कोटीची मदत केली असल्याचं सांगितलं, परंतु मदत कोणत्या दराने दिली हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं. 31.5 लाख शेतकऱ्यांना 2215 कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला सरासरी 7000 रु दिले आहेत. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत 8500 प्रती हेक्टर म्हणजेच 3400 रु. एकरी याप्रमाणे देण्यात आली. एकरी 3400 रुपयात काय होणार आहे? तुमच्या सरकारी घरातील बेडरूमची गादी आणि सोफा २० लाखाचा आणि आमच्या उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला एकरी 3400 रु. मदत… एवढ्या अलिशान सरकारला एवढी तुटपुंजी मदत शोभते का? मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि इतर सर्व मंत्री हेक्टरी ५० हजार रु. मदत देणार की नाही, यावर बोलायला तयार नाहीत. आज या ओल्या दुष्काळात कोरड्या घोषणा आणि खोटी आश्वासने नको तर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रु. मदत द्यावी. 

सरकार जनतेच्या बाबतीत का डगमगते?

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सरकारवर निशाणा साधला आणि म्हटले की, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 31.64 लाख शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हे प्रत्येक शेतकऱ्याला 7000 रुपये इतके आहे. शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान लक्षात घेता, ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. काँग्रेस पक्षाने प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत मागितली आहे. आपल्या व्यावसायिक मित्रांसाठी उघडे असलेले सरकार जनतेच्या बाबतीत का डगमगते? असा सवाल त्यांनी केला.

Continues below advertisement

दरम्यान, फडणवीस लातूर दौराही करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार धाराशिव आणि बीड जिल्ह्यांना भेट देतील, तर एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवच्या विविध भागांना भेट देतील, असे अधिकाऱ्याने सांगितले. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जालना जिल्ह्यातील विविध भागांना भेट देतील. ते शेतकऱ्यांना भेटतील आणि त्यांच्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतील, असे त्यांनी सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या