Marathi Ekikaran Samiti Govardhan Deshmukh: दादरमधील कबूतरखाना सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानंतर बंदिस्त केल्यानंतर जैन समाजाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. इतकेच नव्हे तर जैन मुलींकडून शस्त्र उचलण्याची भाषा सुद्धा करण्यात आली. यानंतर संतापाची एकच लाट पसरली. त्यामुळे आज दादरमध्ये मराठीकरण समितीकडून कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. मात्र, आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून पांगवलं. यावेळी जोरदार जोरदार झटापट सुद्धा झाली. मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी पोलिसांनी मराठीसाठी रक्त काढल्याचा आरोप केला. तसेच हात मोडल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
आमच्या सोबत लोढासारखे मंत्री नाही हे दुर्दैवी
दरम्यान गोवर्तन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. ज्यावेळी चाकू सूऱ्या घेऊन जैन समाज आंदोलन झाले तेव्हा पोलीस कुठे होते? आमच्या सोबत लोढासारखे मंत्री नाही हे दुर्दैवी असल्याचं गोवर्धन देशमुख म्हणाले. ते पुढे म्हणाले की आमच्यासाठी गृहमंत्री नाहीत. मुख्यमंत्री गृहमंत्री एका विशिष्ट समाजासाठी आहेत. जर कोणी कायदा सुव्यवस्था हातात घेतली तर महामोर्चा काढणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला. ते म्हणाले की मराठ्यांमुळे हिंदुत्व जपले गेले. हा विषय धर्माचा नसून आरोग्याचा असल्याचे त्यांनी नमूद केलं. मी पोलिसांसाठी आलो. मात्र, पोलिसांनी मला जखमेचं बक्षीस दिल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की आम्ही राजकीय पक्षांना आमच्या बाजूनं उभे राहण्यासाठी आवाहन केलं. मात्र आमच्या बाजूने कोणी राहिले नसल्याचे ते म्हणाले. राजाच्या हितासाठी राजकीय पुढारी एकत्र यावं असं आवाहन करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
काय म्हटलं आहे निवदेनात?
एका विशिष्ट समाज धर्माचे नाव घेऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडू पाहत आहे. शस्त्रे काढू, मोर्चे काढू वगैरे भाषा करून असंतोष निर्माण करत आहेत. त्यांना वेळीच आवर घालावा अन्यथा आम्हासही प्रतिउत्तरादाखल मोर्चे काढावे लागतील. नागरिकांना पोलिसांना वेटीस धरणे थांबवले पाहिजे. उच्च न्यायालय आणि कायद्याचा मान सन्मान राखून शांत अबाधित राहिली पाहिजे. काही मूठभर व्यक्ती व गट यांनी जाणीवपूर्वक दादर येथील कबूतर खाण्याच्या बंदिस्त फीडिंग क्षेत्राची तोडफोड करून कबुतरांना खाद्य देण्याची बेकायदेशीर कृती करून उच्च न्यायालयाचा निर्णय, तसेच पोलीस व पालिकेच्या पथकांना प्रत्यक्ष विरोध करून कायदा सुव्यवस्थेला आव्हान दिले आहे.
अधिकृत आदेशांचे उल्लंघन
तसेच महानगरपालिका व आरोग्य विभागाच्या अधिकृत आदेशांचे उल्लंघन केलं आहे. सदर कृती न्यायालयाचा अवमान ठरते. न्यायालयाचे आदेश मोडणे हे उच्च न्यायालय अवमान अधिनियम 1971अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन पालिका आयुक्त व आरोग्य विभागाच्या निर्देशांचे पालन न करणे मुंबई महापालिका कायदा कलम 38, 39 व 39 बी तसेच महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम अंतर्गत गुन्हा आहे. कायदा सुव्यवस्था भंग भारतीय दंड संहिता बीएनएस कलम 186, 188 (2), 169, 270, 283, 353, 505 (2) अंतर्गत दंडणीय कृती आहे.
पोलिसांनी कोणताही पक्षपात न करता कारवाई करावी
संबंधित सर्व व्यक्ती व आयोजकांवर तत्काळ एफआयआर नोंदवावा व उच्च न्यायालय अवमान अधिनियम भारतीय दंड संहिता व मुंबई महानगरपालिका कायदे अंतर्गत कठोर कारवाई करावी व पोलीसांनी कोणताही पक्षपात न करता इतर आंदोलकांप्रमाणेच समान निकषांवर धरपकड व जामीनास विरोध करावा. कायद्याचे राज्य व न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी तातडीने कारवाई करावी ही विनंती, मराठी एकीकरण समितीच्या निर्णयात म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या