Maratha Reservation Update : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) उपोषण सुरु केले आहे. दुसरीकडे मराठा आंदोलक (Maratha Protestors) देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात (Marathwada) मराठा आंदोलन अधिक तापतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, याचे परिणाम एसटी महामंडळला (ST Mahamandal) देखील बसतांना पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांत एसटी बसचे (ST Bus) नुकसान करण्यात आल्याने अनेक ठिकाणी बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. परिणामी महामंडळाला याचा आर्थिक फटका बसला आहे. विशेष म्हणजे मराठा अदोलानाच्या पार्श्वभूमीवर परभणी-हिंगोली (Parbhani - Hingoli) जिल्ह्यात दोन दिवसांत 4  हजार 800 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे एसटी महामंडळाला 64 लाख रुपयांचा फटका बसला.


मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने आंदोलने केली जात आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने बस पेटवून देण्यात आल्या. त्यामुळे काही जिल्ह्यात बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात एकूण सात आगारांचा समावेश आहे. या दोन्ही जिल्ह्यात दिवसभरात 2 हजार 800  बस फेऱ्या होत्यात. परंतु, या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 2400  व रविवारी 2400  अशा मिळून 4  हजार 800  बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 


परभणीत बस पेटवून दिली...


परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे गावात रविवारी परभणी आगाराची परभणी-देऊळगाव बस पेटवून देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. देऊळगाव दुधाटे येथे सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी परभणी आगाराची देऊळगाव-परभणी ही बस काही अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिली. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. 


माजी आमदार आणि आंदोकांमध्ये शाब्दिक बाचाबाची 


लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान ठाकरे गटांचे माजी आमदार दिनकर माने यांच्यात आंदोलकासोबत शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी संतप्त मराठा तरुणांनी माने यांच्या गाडीच्या समोर झोपत आंदोलन सुरु केले होते, मात्र पोलीसांकडून मध्यस्थी करत आंदोलकांना शांत करण्यात आले. मराठा समाजाच्या कार्यकर्ते आंदोलन करत असतानाच तेथून दिनकर माने यांची गाडी जात होती. यावेळी संतप्त मराठा तरुणांनी माने यांच्या गाडीच्या समोर झोपत निषेध केला. त्यामुळे दिनकर माने आणि आंदोकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत माजी आमदार दिनकर माने यांना बाजूला काढलं आणि त्यांची गाडी त्या ठिकाणाहून परत गेली. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


आता माघार नाहीच, सरकारला 20 फेब्रुवारीचा अल्टिमेट; मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दहावा दिवस