Prakash Shendge : सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कोणी दगड मारले हा आमचा प्रश्न नाही ते सरकार आणि पोलिसांनी पाहावं असे मत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केलं. आमचा सुप्रिया सुळे यांना सवाल आहे ते जरांगेच्या स्टेजवर गेल्याच कशाला? त्यांच्या वडिलांनी देशात पहिल्यांदा ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू करून आरक्षण दिलं आणि त्याच आज जरांगेना पाठिंबा द्यायला स्टेजवर जातात? याला शरद पवारांचा पाठिंबा आहे का? हा शरद पवारांना आमचा सवाल आहे असे शेंडगे म्हणाले. जरांगे यांची कायद्याला धरून मागणी नाही घटनेला धरून मागणी नाही कोणीतरी म्हणत गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही त्यांच्या स्टेजवर सुळे जातात. याबाबत आम्ही शरद पवारांची भेट घेणार आणि याबाबत त्यांना प्रश्न विचारणार असल्याचे शेंडगे म्हणाले. 

Continues below advertisement


मनोज जरांगे यांची मागणी कायद्याला धरुन नाही


मनोज जरांगे यांची मागणी कायद्याला धरुन नाही. याबाबतीत कागदपत्रे माझ्याकडे आहेत. अॅड जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केले आहे. कुणबी वेगळे आहेत, मराठा वेगळे आहेत. त्यामुळे जी मागणी केली जात आहे ती घटनेला धरुन नाही असे शेंडगे म्हणाले. 


एकनाथ शिंदे यांनी नेमलेली शिंदे समिती आणि त्यांनी दिलेला अहवाल बोगस


माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमलेली शिंदे समिती आणि त्यांनी दिलेला अहवाल हा बोगस आहे. याबाबत आमची कायदेशीर लढाई सुरू आहे. 58 लाख देण्यात आलेले दाखले बोगस आहेत. मराठा समाजाची फसवणूक सुरु आहे सर्व दाखले बाद होणार आहेत असे शेंडगे म्हणाले. इतिहासातील गॅझेटमध्ये नाव आहे म्हणून तो मागास आहे असं होतं नाही. त्यामुळे देण्यात आलेले दाखले बोगस आणि खोटे आहेत. जर असे दाखले देणे शक्य असतं तर पूर्ण देश ओबीसी झाला असता असे शेंडगे म्हणाले. उद्या दुपारी ३ वाजता मिटिंग आहे. आम्ही सर्व ओबीसी एकत्र येत आहोत आणि या सगळा गोष्टींच्या विरोध करणार आहोत असे शेंडगे म्हणाले. 


मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. लाखो मराठा कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमधून मराठ समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी जाणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.