कोल्हापूर : यंदाही दिवाळी सणाच्या निमित्ताने कोल्हापुरात ‘माणुसकीची भिंत’ उभारण्यात आली आहे. ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’ हे ब्रीद घेऊन सुरुवात झालेल्या ‘माणूसकीची भिंत’ या उपक्रमाला दुसऱ्या वर्षीही मोठा प्रतिसाद मिळाला आहे.


या उपक्रमातून आजपासून दोन दिवस हजारो गोरगरिबांना मोफत कपड्यांचे वाटप केलं जाणार आहेत.

दिवाळीनिमित्त सारे शहर आनंदात आहे. खरेदीत मग्न आहेत. हे घडत असतानाच समाजातील एक घटक या साऱ्यांपासून अलिप्त आहे. दिवाळी असली तरी त्याच्याकडे अंग झाकण्यापुरतेही कपडे नाहीत. अशा वंचित घटकाला दिवाळीचा सणला छान छान कपडे घालून सण साजरा करता यावा या उद्देशाने  काही युवकांच्या संकल्पनेतून ‘माणुसकीची भिंत’ कोल्हापुरातील सीपीआर चौकात उभी राहिली.

गेल्या वर्षी दिवाळीपासून या उपक्रमाला सुरुवात झाली. वर्षातून दोनदा म्हणजेच दिवाळी आणि गुढी पडावा सणाला या उपक्रमाचे आयोजन करण्यात येतं.

कोल्हापुरातील अनेक दानशूर नागरिकांनी पहिल्याच दिवशी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जुने-नवे कपडे, ड्रेस, स्वेटर्स, ब्लेझर्स, पॅँट्स, कुर्ते, जीन्स, लहान मुलांचे कपडे, साड्या, कानटोपी, स्कार्फ ‘माणुसकीच्या भिंती’वर आणून ठेवल्या. काहींनी तर नवीन शर्ट आणि वापरले कपडे धुवून इस्त्री करुन आणून दिले. गरजू त्यांच्या मापानुसार ते घेऊन जातात. आज सकाळी सकाळी आठपासूनच या ठिकाणी कपडे घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

या उपक्रमाचे अनुकरण करत पुणे, मुंबई, बिहार, छत्तीसगड यांसह अन्य ठिकाणी ‘माणुसकीच्या भिंती’ उभ्या राहिल्या आहेत. ही संकल्पना गोरगरिबांसाठी आधारवड ठरते आहे.