Sangola Assembly Constituency : सांगोला विधानसभा मतदारसंघात (Sangola Vidhansabha Election) महायुतीचे उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत. त्यामुळं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आवाहनाचा कोणताही परिणाम सांगोल्यात होणार नाही असा दावा भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार (Chetan Singh Kedar) यांनी केला आहे . आज सांगोला विधानसभेसाठी भाजपची बैठक घेण्यात आली. यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्व 103 गावातून भाजपचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


जरांगे पाटील यांनी कितीही उमेदवार उभे करु देत, सांगोल्यात परिणाम होणार नाही


मनोज जरांगे पाटील हे दूषित विचाराने सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. आता ते उमेदवार उभे करायचं म्हणत असतील तर त्यांना 288 मतदारसंघात उमेदवार जरी मिळाली तरी खूप आहे असा टोला केदार यांनी लगावला. जरांगे पाटील यांनी कितीही उमेदवार उभे करु देत त्याचा सांगोल्यात कोणताही परिणाम होणार नसून सांगोल्यात महायुतीचा मोठा विजय होईल असा दावा त्यांनी केला आहे.


दीपक साळुंखे यांच्या जाण्याने कोणताही फरक पडणार नाही


दरम्यान, यावेळी दीपक साळुंखे पाटील यांनी मशाल हाती घेतल्याने काय फरक पडेल यावर ही चर्चा करण्यात आली. दीपक साळुंखे यांच्या जाण्याने कोणताही फरक महायुतीच्या उमेदवाराला पडणार नसून अगदी शे पाचशे मते देखील कमी होणार नाहीत असा दावा केदार यांनी केला. महाविकास आघाडीत देखील उद्धव ठाकरेंच्या भूमिकेने बिघाडी झाल्यामुळे महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असे  केदार यांनी सांगितले.


सांगोल्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता


वास्तविक सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनं सांगोल्यात मोठा बिघाड झाला असून आता शेतकरी कामगार पक्षाकडूनही निवडणूक लढवली जाणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या मागे शरद पवार यांची छुपी ताकद राहणार असल्याने याचा फायदा थेट शहाजीबापू पाटील यांना होईल असेही चेतन सिंह केदार यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दीपक साळुंखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाकरेंनी त्यांना सांगोला विधानसबा निवडणूक ळडवण्यासाठी उमेदवारी देण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळं ठाकरेंनी जर दीपक साळुंखे पाटील यांना संधी दिली तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण शेकप हा देखील महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. त्यामुळं बाबासाहेब देशमुख हे सांगोल्यातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार?