बीड : मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) 24 डिसेंबरनंतरची पुढील दिशा काय असणार यासाठी आज बीडमध्ये (Beed) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची सभा होत आहे. या सभेपूर्वी मनोज जरांगे यांनी बीड शहरात पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. सरसकट आरक्षणावर आम्ही ठाम असून, सरकारकडे आज आणि उद्याचा दिवस आहे. बाकी सर्व माहिती आजच्या सभेत सांगणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे. 


यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "किती दिवस आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार. आजच्या सभेत सर्वकाही सांगणार आहे. संयम किती दिवस पाळायचा आम्हालाही मर्यादा आहे. सरकारच्या हातात आजचा आणि उद्याचा दिवस आहे. सरकारने लिहिलेले शब्द सरकार पाळत नाही. आजच्या सभेतून मराठा समाजासमोर सर्व सत्य मांडणार आहे. मराठा समाजाने आणखी किती दिवस अन्याय सहन करायचा. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी आमची आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही आरक्षण मागत आहोत," असे जरांगे म्हणाले. 


भुजबळांवर टीका...


दरम्यान, पुढे बोलतांना जरांगे यांनी छगन भुजबळांवर देखील निशाणा साधला आहे. "मागील दोन महिने सरकारने काय केलं. वेळोवेळी आम्ही सरकारला सांगितले की अभ्यासक वाढवा. त्यावेळी सरकार त्याचं (छगन भुजबळ) ऐकत होते. लोकांना उचलून आतमध्ये टाकले जात होते. त्याचं (छगन भुजबळ) स्वप्न पूर्ण करत होते. तुम्ही मराठा समाजाला किती येड्यात काढणार आहेत. तुम्हाला वाटतं त्याचं (छगन भुजबळ) ऐकल्यावर आपल्याला फायदा होईल. भुजबळांच्या मनात मराठ्यांविषयी विष आहे. सरकारला देखील भुजबळ यांच्या एकट्याचीच गरज आहे. त्यामुळे आता त्यांच्या घरा शेजारीच तुम्हीही घर बांधा असा खोचक टोला जरांगे यांनी लगावला.


जरांगे आणि बच्चू कडू यांच्यात चर्चा...


मनोज जरांगे हे बीडच्या सभेकडे निघाले आहेत. त्यापूर्वी बच्चू कडू आणि मनोज जरांगे यांच्या बैठक झाली आहे. यावेळी आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. तसेच, सरकराने सरसकट शब्दाला पर्यायी चार शब्द दिले होते. आता त्या शब्दावर त्यांनी ठाम राहिले पाहिजे असे जरांगे म्हणाले आहेत. तर, मी इथे आंदोलक म्हणून आलो असल्याचे बच्चू कडू म्हणाले आहेत. तसेच, सगेसोयरेची व्याख्या करणे गरजेचे असल्याचे देखील बच्चू कडू म्हणाले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation : सरसकट आरक्षणावर ठाम, सरकारकडे आता उद्याचा दिवस; मनोज जरांगेंचा सभेपूर्वी सरकारला इशारा