Manoj Jarange Patil: हैदराबाद गॅझेटिअरनुसार (Hyderabad Gazetteer) नोंदी आढळतील, त्या मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईत मोठे आंदोलन केलं होतं. त्यानंतर सरकारने जीआर काढत मनोज जरांगेंची मागणी मान्य केली. आता मागणी मान्य झाल्यावर गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यातील केवळ 98 जणांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहे. आठ जिल्ह्यातून केवळ 594 अर्ज आले आहेत. पण, त्यातील केवळ 98 जणांना अर्ज प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement

संभाजीनगरमध्ये 14 अर्ज प्राप्त झाले असून कोणताही अर्ज मान्य झाला नाही, तर परभणीत 445 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी 47 अर्ज मान्य ठरले. जालनामध्ये 78 अर्ज प्राप्त झाले असून आठ अर्ज मान्य ठरले, हिंगोलीमध्ये पाच अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी तीन अर्ज मान्य झाले. नांदेडमध्ये पाच अर्ज प्राप्त झाले आणि सर्व पाच अर्ज मान्य ठरले, तर बीडमध्ये 12 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी नऊ अर्ज मान्य झाले. लातूरमध्येही 12 अर्ज प्राप्त झाले असून नऊ अर्ज मान्य ठरले, तर धाराशिवमध्ये तेरा अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी चार अर्ज मान्य ठरले आहे. आता यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायला दिरंगाई करु नका, असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय.

Manoj Jarange Patil: मराठा समाजाने अर्ज दाखल करायला हवेत

मनोज जरांगे पाटील यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना म्हटले आहे की, सरकारने दिरंगाई करू नये. वेळेत प्रमाणपत्र द्यावे. मराठा समाजाने देखील अर्ज दाखल करायला हवेत. तरच आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. अधिकाऱ्यांनी दिरंगाई करू नये. अर्ज आल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. मराठी समाज लढाई जिंकलेला आहे. त्याचा जीआर निघालेला आहे. गॅझेटिअरचा जीआर आमचा हाती आला हे आमचे मोठे यश आहे, असे त्यांनी म्हटले.

Continues below advertisement

Manoj Jarange Patil: मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्या

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री साहेब आणि विखे पाटील साहेबांना सांगणे आहे की, तुम्ही मराठा समाजाच्या हितासाठी जीआर काढलेला आहे. अधिकाऱ्यांना तुम्ही तातडीचे आदेश द्या की, ज्या नोंदी सापडलेले आहेत त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या. शिंदे समितीला आदेश द्या की, त्यांनी नोंदी तत्काळ शोधाव्या. हैदराबाद गॅझेटिअरच्या जीआरप्रमाणे मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी विनंती त्यांनी केली. 

Manoj Jarange Patil: फडणवीस साहेबांनी अधिकाऱ्यांना सक्त आदेश द्यावेत

मराठा समाजाचे अर्ज कमी प्रमाणात येत आहेत. याबाबत विचारले असता जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला मी आवाहन करत आहे की, लेकरा बाळांच्या आयुष्याच्या कल्याणासाठी तुम्ही अर्ज करा. आमचे खेड्यापाड्यातले गरीब लोक आहेत. गरिबांना लवकर लक्षात येत नाही की अर्ज कसा करायचा. गाव पातळीवर ज्या समित्या गठीत करण्याचे ठरलेले आहे ते अद्याप झालेले नाही. त्यामुळे लोकांना अर्ज कुठे करायचा हे समजत नाही. अनेक ठिकाणी अधिकारी आदेशच नसल्याचे सांगतात. फडणवीस साहेबांनी अधिकाऱ्यांना सक्त आदेश द्यावेत. हैदराबाद गॅझेटचा जीआर आम्ही काढलेला आहे. तुम्ही लोकांना सांगा की अर्ज करा. ज्याने अर्ज केलेला आहे त्याला तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्यावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे, असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर एक तारखेपासून आम्ही सगळीकडे मराठ्यांनी अर्ज भरण्यासाठी आवाहन करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. 

Radhakrishna Vikhe: लवकरच हेल्पलाइन नंबर सुरू करणार : राधाकृष्ण विखे पाटील

दरम्यान, याबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, जरांगे पाटील यांनी जी खंत व्यक्त केली आहे, त्याची माहिती मी घेतली आहे. हा निर्णय झाल्यानंतर इतक्या कमी प्रमाणात प्रमाणपत्र मिळणे ही लक्ष देण्याची बाब आहे. जिथे कुठे अडवणूक होत असेल, त्यासाठी आम्ही लवकरच हेल्पलाइन नंबर सुरू करणार आहोत. प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असेल त्या ठिकाणी मदत केली जाईल. मी सर्व लोकप्रतिनिधींना सुद्धा सूचना देत आहे की, या शासन निर्णयातून ज्या-ज्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळण्याचा अडचणीत आहेत त्या ठिकाणी लक्ष घालावं. स्थानिक पातळीवर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने काम सुरू आहे. त्यामुळे निश्चितच शासन निर्णयानंतर लाभार्थ्यांना लाभ मिळेल आणि हा आकडा सुद्धा वाढत जाईल. त्यांच्या मागणीचा विचार पूर्णपणे केला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  

आणखी वाचा 

BJP-Shivsena Shinde Group BMC Election 2025 मोठी बातमी: मुंबईतील मुस्लिम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाचा सर्व्हे आला समोर