Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या विषयी आक्षेपार्ह व्हिडीओ करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे काल रात्री मनोज जरांगे यांचे समर्थक व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तीला जाब विचारण्यासाठी वसमत तालुक्यातील भेंडेगाव या गावांमध्ये गेले होते. हा जाब विचारण्यावरून दोन गटांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली होती. यामुळे भेंडेगावमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. याची माहिती कुरुंदा पोलिसांना मिळताच कुरुंदा पोलिसांनी जमावाला फैलवत गावात शांतता प्रस्थापित केली. त्यानंतर मनोज जरांगे यांचे समर्थक पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
मनोज जरांगे यांच्याबाबत अपशब्द वापरत व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कुरुंदा पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी दोषीवर कारवाई करण्याचा आश्वासन पोलीस ठाणे परिसरात जमलेल्या नागरिकांना दिले आहे. त्यावरून मनोज जरांगे यांच्याबाबत अपशब्द वापरत व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा आश्वासन दिल्यानंतर कुरुंदा पोलीस ठाणे परिसरातील गर्दी कमी करण्यात आली. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तीन व्यक्तीच्या विरोधात कुरुंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी एक तक्रार आलेली आहे. त्याप्रकरणी कारवाई केली जात आहे, अशी माहिती कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांनी दिली.
पोलिसांनी कोणती माहिती दिली?
भांडेगाव गावामध्ये मोठ्या प्रमाणात लोक जमले आहेत ही माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. काल जो ओबीसीचा कळमनुरीमध्ये मोर्चा होता. त्यामध्ये एका इसमाने मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.त्यामुळे महागाव आंबा आणि इतर काही गावातील तरुण व्हायरल व्हिडीओ प्रकरणी भेंडेगाव या गावांमध्ये जाब विचारण्यासाठी गेले होते. आम्ही भेंडेगावमध्ये गेल्यानंतर तिथे कोणतीही तोडफोड किंवा मारहाण झाल्याचा आम्हाला आढळून आला नाही, तशी तक्रार आमच्यापर्यंत कोणीही घेऊन आलं नाही. दोन समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी एक तक्रार आलेली आहे, त्याप्रकरणी कारवाई केली जात आहे. आता गावामध्ये एकदम शांतता आहे. भेंडेगाव मधील दोन्ही समाजातील नेते आणि प्रतिष्ठित नागरिकांना अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांनी वाद होऊ नये याबाबत सूचना केल्या आहेत. भेंडेगावात आणि पोलीस ठाणे परिसरामध्ये आता शांतता आहे. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, कायदेशीर प्रक्रिया पोलीस करत आहेत, असं आवाहन रामदास निरदोडे यांनी केलं. गाड्यांची तोडफोड झाली किंवा असं आतापर्यंत तरी कोणी म्हटलेलं नाही. याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कार्यवाही आम्ही करत आहोत. काल कळमनुरीमध्ये जो ओबीसीचा मोर्चा होता. त्या मोर्चामध्ये संबंधित इसमाने मनोज जरांगे यांच्यावर आक्षेपार्ह व्हिडिओ केला होता. तो व्हिडिओ सदरील व्यक्तीने समाज माध्यमावर प्रसारित केलेला आहे. तो व्हिडिओ खरा आहे का? याबाबत योग्य ती चौकशी करून आम्ही कारवाई करत आहोत, अशी माहितीही रामदास निरदोडे यांनी दिली.