मराठा आंदोलकांची मागणी मान्य, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून मुदतवाढ मिळाली
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. काल मुंबई पोलिसांनी उपोषण करण्यासाठी एक दिवसाची परवानगी दिली होती. त्यानंतर उद्याही आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु आहे. लाखो मराठा कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. काल मुंबई पोलिसांनी उपोषण करण्यासाठी एक दिवसाची परवानगी दिली होती. त्यानंतर उद्या आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना परवानगी मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता.मराठा आंदोलनाला मुदत वाढवून देण्यासाठी मराठा आंदोलकांनी मुंबई पोलिसांना अर्ज दिला होता. अखेर त्यांची मागणी मंजूर झाली असून, आंदोलन करण्यास एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाला मुदत वाढवून देण्यासाठी मराठा आंदोलकांनी मुंबई पोलिसांना अर्ज केला होता. यानुसार मराठा आंदोलनाला मुदतवाढ देण्यात आली आहे. उद्याही आंदोलनाला परवानगी देण्यासाठी मुंबई पोलिस सकारात्मक भूमिका घेतली आहे. आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांची रोज परवानगी घ्यावी लागणार आहे.
सरसकट मराठे कुणबी असल्याचा जीआर निघाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार नाही
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातील आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आपला निर्धार कायम ठेवला आहे. सरसकट मराठे कुणबी असल्याचा जीआर निघाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. पहिल्या दिवशी सरकारकडून कोणत्याही प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क करण्यात आला नव्हता. त्याचबरोबर आझाद मैदानात झालेल्या गैरसोयीवरूनही बरीच सडकून टीका झाल्यानंतर आज सकाळी बीएमसी प्रशासनाकडून आझाद मैदान परिसरामध्ये तातडीने सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. त्यानंतर दुपारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री न जाता शिंदे समितीला मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आझाद मैदानात पाठवण्यात आलं. यावेळी समितीकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेत सरकार कोणकोणत्या बाबींवर काम करत आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न केला.
हैदराबाद आणि सातारा संस्थान तसेच औंध संस्थानातील गॅझेटिअर संदर्भातही मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. सातारा आणि हैदराबाद संस्थांचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक मिनिटाचा सुद्धा वेळ देणार नाही असा निर्धार जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला. दुसरीकडे औंध संस्थानाच्या गॅझेटिअरचा अभ्यास करण्यासाठी वेळ देण्याची तयारी जरांगे पाटील यांनी दर्शवली. दरम्यान, एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार हा शिंदे समितीचा नसून तो मागासवर्गीय आयोगाचा असल्याचे सांगते शिंदे समितीने त्या संदर्भात अधिक टिप्पणी करण्याचे टाळलं.
महत्वाच्या बातम्या:























