Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: 308 कुणबी प्रमाणपत्रे गॅझेटरप्रमाणे निघाली आहेत, याचा अर्थ हैदराबादचा जीआर लागू झाला आणि त्याची अंमलबजावणी झाली आहे. हैदराबादच्या जीआरप्रमाणे मराठवाड्यातले मराठे हे सगळे कुणबी आहेत. इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांनी रोखू नये, सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन व्हॅलिडिटी द्यावी, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 30 मे पासून मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत.
तुमचे शहाणपण मी मराठ्याच्या पुढे चालू देणार नाही
फडणवीस साहेब, या गोरगरिबांची मने जिंका. तुमच्या 50 पिढ्या आल्या तरी मी मराठ्याला धक्का लावू देणार नाही असे जरांगे पाटील यांनी सांगितले. आंदोलनाच्या तारखेच्या आत जर तुम्ही हे प्रमाणपत्रे देण्याचे काम केले नाही, तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा. फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभियान घेऊन प्रमाणपत्रे दिली, तसेच फडणवीस साहेबांनीही छातीठोकपणे मी जीआर काढलाय आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र देणार, असे सांगून अभियान राबवावे असे आवाहन त्यांनी केले. तुमचे शहाणपण मी मराठ्याच्या पुढे चालू देणार नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे. सातारा आणि कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटचा जीआर काढण्यासाठी सरकारने आठ महिने वेळ घेतला, यावर त्यांनी संताप व्यक्त केला.
ते म्हणाले की, इथं भेदभाव नसतो, पाच विभाग आमचे आहेत आणि अखंड महाराष्ट्र आमचा आहे. मराठवाड्याला मिळालं म्हणून पश्चिम महाराष्ट्र मागे आहे असं अजिबात नाही, असे सांगत त्यांनी मराठा समाजाच्या एकजुटीवर भर दिला. सरकारला विचार करण्यासाठी आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठ्याला आरक्षण नव्हते तेव्हा झोपला होता का?
जरांगे पाटील यांनी सांगितले की, सरकारने नुकताच एक जीआर काढला आहे, ज्यानुसार आता ओबीसीला ओपनच्या जागा घेता येणार नाहीत. जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण नव्हते तेव्हा तुम्ही झोपला होता का? जर हा निर्णय आधी घेतला असता, तर ओबीसींनी ओपनच्या 50 टक्के जागा खाल्ल्या नसत्या. या नवीन जीआरचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी 28 मे रोजी बैठक बोलावली आहे. 28 मे रोजी राज्यातील सर्व अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ आणि समन्वयकांनी आंतरवाली येथे यावे. हा जीआर समाजासाठी चांगला आहे की नाही, हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे.
खोट्या प्रतिष्ठेत मराठ्याने जगायचे बंद करा
जरांगे यांनी सांगितले की,आपल्या जमिनी कमी झाल्या आहेत, दोन-चार एकरवर आपण आलो आहोत. खोट्या प्रतिष्ठेत मराठ्याने जगायचे बंद करा. कोणी पाटील किंवा साहेब म्हटले की आपण फुगतो, पण त्याने समाजाचे वाटोळे झाले आहे. केवळ जमिनी असून चालणार नाही, तर पोरांना उच्च शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्येही आरक्षण पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या
