Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आता चलो दिल्लीचा (Delhi) नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली आहे. हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट अंमलबजावणीनंतर हे अधिवेशन होणार असल्याचे जरांगे म्हणाले. लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे. धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेट संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मनोज जरांगे पाटलांनी ही घोषणा केली.
दिल्लीला आम्ही मागण्या घेऊन जाणार नाहीतर...
दिल्लीला आम्ही मागण्या घेऊन जाणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आमचे मराठा बांधव अनेक राज्यामध्ये विखुरले आहेत. कधीकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केले. सगळे बांधव एकत्र आले पाहिजेत अशी भूमिका आहे. महाराष्ट्रातील मराठा बांधव हरियाणाला भेटणार आहोत. हरियाणाचे बांधव महाराष्ट्राला भेटणार आहेत. तर गुजरातमधील मराठे महाराष्ट्रातील मराठ्यांना कडकडून मिठ्या मारतील. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, गोवा, दिल्ली या ठिकाणचे मराठे आपल्या महाराष्ट्रातील भावांना मिठ्या मारतील असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आम्ही खूप दिवसांनी एकमेकांना भेटणार आहोत असे जरांगे म्हणाले. आम्ही प्रत्यक्ष ऐकमेकांना भेटणार आहोत, तो आनंद सोहळा असणार आहे. तो सुवर्णदिवस असणार आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आमच्या राजाने अटक पासून कटकपर्यंत अफगानिस्तानपर्यंत झेंडा फडकवला आहे, दिल्लीतही झेंडा फडकावला. कुठे कुठे आपल्या राजाचे पवित्र पाय लागले. ती भूमी पवित्र झाली, त्या भूमिला नतमस्क झाले पाहिजे. त्यामुळं आपल्या मराठा बांधवांसाठी, मराठा समाजासाठी मोठं अधिवेशन दिल्लीला घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर पाच दिवस आमरण उपोषण केलं होतं. त्यानंतर त्यांच्या आठपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या. मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. सरकारच्या या जीआर नंतर मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतले होते. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयानंतर राज्यातील ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाच्या नेत्यांनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या: