Beed News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुनच रचण्यात आल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.  यामुळं सबंध राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गेवराई येथून जालना पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. गेवराई तालुक्यातील धानोरा येथील अमोल खुणे यांचा या अटकेत समावेश आहे. याबाबत अमोल खुणेच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे, माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून मनोज जरांगे यांच्या विरुद्ध षडयंत्र रचल्याची माहिती पत्नीने दिली आहे.

Continues below advertisement


माझ्या पतीला या प्रकरणात अडकवलं जातंय, त्यांचा काहीही संबंध नाही


मागील एक महिन्यापासून माझ्या पतीला दारु पाजत होते. त्या नशेमध्ये त्यांच्याकडून हे सगळं करून घेतलं जात होतं. मात्र माझे पती मराठा आंदोलक जरांगे पाटलांचे सुरुवातीपासून कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये व स्टेटसला नेहमी जरांगे पाटलांचे फोटो असतात. ते जरांगे पाटलांना देव मानतात. माझ्या पतीला या प्रकरणात अडकवलं जात आहे. त्यांचा काहीही संबंध नाही, असा धक्कादायक दावा आरोपी अमोल खुणे याची पत्नी आणि आईने केला आहे. त्यामुळं या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. माझ्या मुलाचा या प्रकरणात काहीही संबंध नाही, असे म्हणत अमोल खुणेच्या आईला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. याप्रकरणी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.


जालना गुन्हे शोध पथकाने दोघांना घेतलं ताब्यात


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोन जणांनी जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचत असल्याची तक्रार जालना पोलिसांकडे बीडच्या काही कार्यकर्त्यांनी केली होती. या तक्रारीवरून जालना गुन्हे शोध पथकाने दोघांना ताब्यात घेतलं असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.


नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?


माझं आणि धनंजय मुंडेचं वैर नाही, त्याने जी घटना करायला नको होती त्याने ती केली आहे, हा चेष्टेचा विषय नाही. त्याने परिस्थिती मर्यादेच्या पुढे नेली, राजकारण आणि आरक्षण एकत्र करण्याची गरज नाही. मला माहिती मिळाली होती मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली. घातपाताच्या प्रकरणात आठ-दहा जण आहेत, त्यात धनंजय मुंडे पण आहे. त्याप्रकरणाची चौकशी व्हायला नको का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडे नार्को टेस्ट करायचं म्हणत असेल तर मी पण नार्कोटेस्ट करुन घ्यायला तयार आहे. उद्या मी गृहमंत्रालयात, कोर्टात, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार आणि नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार आहे. धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे, आरोप नाही केले. मी असे खुनाचे, घातपात करण्याचे आरोप नाही करु शकत. नार्को टेस्टला सगळ्यात आधी माझा अर्ज जाईल, तू काय सीबीआयची मागणी करतो? असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.


महत्वाच्या बातम्या:


धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप