Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी (Death Threat) मोठी माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडीतून न्यायालयीनं कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अणोल खुणे, दादा गरुड आणि कांचन साळवीला 14 दिवसांची न्यायालयीनं कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, आज जालन्यातील अंबड प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणातील आरोपींना हजर केले होते. यावेळी न्यायालयानं त्यांना पोलिस कोठडीतून न्यायालयीनं कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दादा गरड आणि अमोल खुणे यांना अटक केली होती. त्यानंतर 11 नोव्हेबंरला रात्री उशीरा कांचन साळवी (Kanchan Salvi) पोलिसांनी अटक केली होती. दादा गरड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन सळवीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा PA असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
नेमकं प्रकरण काय?
बीडमधून खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती उघड झाली आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांत ही हत्या करण्याचा कट रचला होता. या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतलं होतं. धक्कादायक म्हणजे कट रचणारा हा बीडच्या परळीतील एक बडा नेता असल्याचा आरोप केला जातो आहे. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट बीड जिल्ह्यात झालेल्या एका बैठकीत रचण्यात आला होता. त्याच बैठकीत असलेल्या समर्थकाने जरांगे पाटील यांना ही बाब सांगितली. त्यानंतर जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी रात्री पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन तक्रार केली होती. जरांगे यांनीही पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. या तक्रारीनुसार पोलिस अधीक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत गेवराई येथील दोन संशयितांना पथकाच्या माध्यमातून तातडीने ताब्यात घेतले होते. त्यातील एक संशयित हा जरांगे पाटील यांचा जुनाच सहकारी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, माझ्या खुनाचा कट रचला गेला हे सत्य आहे. कट शिजला गेला. यासंदर्भात पोलिस अधीक्षक स्वतः लक्ष घालून आहेत. तपासात दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे जरांगे पाटील म्हणाले होते. तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले होते.
मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा धनंजय मुंडेंची मागणी
मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत आपल्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही याला उत्तर देत हे आरोप फेटाळले होते. तसंच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली. यासोबतच आरोपींसह आपली आणि मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करण्याची मागणीही धनंजय मुंडेंनी केली.