Mumbai Cruise Drug Case : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण मिळालं असून याप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणामुळं राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच नवाब मलिकांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) एकापाठोपाठ एक आरोप करत नवनवे दावे केले. हे सत्र थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचलं होतं. अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणाचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देताना सर्व आरोपांचं खंडन केलं होतं. तसेच, दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार आज दुपारी 12 वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर नवाब मलिकही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषदेतून नेमका कोणता बॉम्ब फोडणार आणि त्यानंतर मलिक त्यांना काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आज दुपारी 12 वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पत्रकार परिषद घेणार असून याबाबत नीरज गुंडे यांनी ट्वीट केलं आहे. नवाब मलिकांनी आरोप करताना नीरज गुंडे देवेंद्र फडणवीसांसाठी वसुलीचं काम करतात आणि देवेंद्र फडणवीसही सारखे त्यांच्या घरी जातात, असा आरोप केला होता. त्यामुळे आज दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस काय गौप्यस्फोट करणार? याकडे लक्ष लागलं आहे.
नीरज गुंडे हा मागील सरकारचा दलाल : नवाब मलिक
नीरज गुंडे हा मागील सरकारचा दलाल आहे, हा दलाल माझ्यावर आरोप करतोय. ज्याच्या चेंबूरच्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचं. सगळ्या विभागाच्या सेक्रेटरींच्या ऑफिसमध्ये याचं जाणं येणं होतं. वर्षावर हा कायम फिरत असायचा. रश्मी शुक्लाच्या प्रकरणात देखील गोंधळ घालत होता. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल आता समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. हा तिथं का बसत असतो? त्याच्या मागे एक कारण आहे. कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही बाब मी लवकरच समोर आणणार आहे. त्यानंतर भाजपच्या लोकांना राज्यभरात तोंडं दाखवायची लायकी उरणार नाही. आशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरज गुंडे यांना फटकारलं होतं.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज संबधात केलेल्या आरोपाचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केलं आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणाचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना गर्भित इशारा दिला आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. याचे पुरावे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचं ते म्हणाले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. ते कोणत्या मानसिकतेत आहेत, हे सर्वांना माहित आहे. नवाब मलिक यांनी फोटो पोस्ट केलाय, त्यासंदर्भात रिव्हर मार्चच्या संदर्भातील लोकांनी स्पष्टीकरण दिलेय. आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता. चार वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे. त्यांना आज सापडलाय. त्या व्यक्तीशी आमचा संबध नाही. गाण्याच्या शुटींगवेळी सर्व फोटो काढण्यात आले आहेत. सर्व टीमने फोटो काढले होते. पण नवाब मलिक यांनी फक्त माझ्या पत्नीसोबतचा फोटो ट्विट केलाय. यावरुन त्यांची मानसिकता दिसतेय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
है तैयार हम! नवाब मलिक यांचं देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज
मुंबई ड्रग्ज प्रकरणानंतर सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी थांबायचं नाव घेईनात. दररोज नवनवे आरोप आणि खुलासे समोर येत आहेत. समीर वानखेडे यांच्यावरील आरोपापासून सुरु झालेलं प्रकरण आता देवेंद्र फणडवीस यांच्यापर्यंत पोहचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्ज कनेक्शसंदर्भात आरोप केले होते. या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या या इशाऱ्याला नवाब मलिक यांनी थेट चॅलेंज दिलेलें. नवाब मलिकांनी यासंदर्भात ट्वीट केलं होतं. ते म्हणाले होते की, "है तैयार हम" तसेच ट्वीटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टॅग केलं होतं.