Solapur : 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा (Malegaon Blast Case) निकाल आज (31 जुलै) मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला. तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, मालेगाव स्फोटानंतर महिबूब मुजावर हे ATS चे तत्कालीन पोलीस निरीक्षक होते. मात्र त्यानंतर वेगळ्या गुन्ह्यात त्यांचे नावं आल्यानंतर त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेलं होतं. दरम्यान, या निकालानंतर महिबूब मुजावर हे प्रथमच माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी 'एबीपी माझा'वर धक्कादायक खुलासे केले आहेत.
नेमकं काय म्हणाले महिबूब मुजावर ?
मालेगाव प्रकरणाचा निकाल आल्यानंतर निवृत्त पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर पहिल्यांदाच माध्यमासमोर आले आहेत. तत्कालीन मालेगाव स्फोटाचे प्रमुख तपास अधिकारी परमवीर सिंह यांनी मला RSS प्रमुख मोहन भागवत यांना धरून आणण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर भगवा आतंकवाद हे सर्व खोटं आहे. भगवा आतंकवाद त्यांना सिद्ध करायचा होता म्हणून मला खोटा तपास करण्यासाठी सांगितल्याचे महिबूब मुजावर म्हणाले. त्यांच्याबरोबर या प्रकरणातील आरोप संदीप डांगे, रामजी कलसंग्रा यांची हत्या झालेली होती. मात्र ते आरोप जिवंत आहेत असा तपास करण्याचे आदेश मला परमवीर सिंह यांच्यासह वरिष्ठांनी दिले होते असे मुजावर म्हणाले. त्याचबरोबर तत्कालीन सरकारने ते जिवंत असून त्यांचे नाव चार्जशीट मध्ये घातले होते. मात्र मी या सर्व गोष्टींना विरोध केला आणि चुकीचे काम मी करणार नाही हे सांगितले. त्यामुळे माझ्यावर अनेक खोट्या केसेस केल्या मात्र मी त्यातून मी निर्दोष मुक्त झाल्याचे मुजावर म्हणाले.
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात झाला होता भीषण बॉम्बस्फोट, सहा जणांचा झाला होता मृत्यू
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाला आज जवळपास 17 वर्षे पूर्ण होत आहेत. भिक्खू चौकात घडलेल्या या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. या प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनंतर आज (31 जुलै) मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला. या खटल्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी एनआयएने केली होती. त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. आता या प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, मेजर रमेश शिवाजी उपाध्ये, समीर शरद कुलकर्णी, अजय एकनाथ राहिरकर, प्रसाद श्रीकांत पुरोहित, सुधाकर उदयभान धर द्विवेदी, सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.