जर महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करायचं असेल, तर प्रत्येक गावात जलसंधारणाची कामं झाली पाहिजे, दुष्काळमुक्तीचा हा साधा आणि सरळ फॉर्म्युला पाणी फाऊंडेशननं अवलंबला. जलसंधारणाच्या कामासाठी महाराष्ट्रानं हातात कुदळ आणि फावडं धरावं म्हणून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली. बीडमधलं अंबाजोगाई, अमरावतीमधलं वरूड, आणि साताऱ्यामधलं कोरेगाव. अशा तीन तालुक्यातली ११६ गावं स्पर्धेत सहभागी झाली.
पाणी फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावानं सर्व शक्ती पणाला लावून जलसंधारणाची कामं केली. आकाशातून बरसणारा प्रत्येक थेंब जिरवण्यासाठी गावोगोवी जणू श्रमदानाच्या जत्रा भरत होत्या. पावसाची पहिली सर कोसळली अन् जलसंधारणाची कामं झालेली गावं पाणीदार झाली. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं शिवधनुष्य पाणी फाऊंडेशननं उचललंय. आणि हे शिवधनुष्य ते यशस्वीरित्या पेलणार यात तीळमात्र शंका नाही. महाराष्ट्राला दुष्काळमुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या पाणी फाऊंडेशनला 'माझा'चा सलाम
संबंधित बातम्या