Majha Maharashtra Majha Vision 2024: राज्यातील (Maharashtra News) दोन मोठो पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आणि संपूर्ण राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. ज्याचा कोणी कधी विचारही केला नव्हता, त्या सर्व गोष्टी राज्याच्या राजकारणता घडताना संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिल्या. आता या सर्व घडामोडींनंतर राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत पाहायला मिळणार आहे. 


गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यानं पाहिलेलं अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा अद्याप थंडावलेल्या नाहीत. अशा तोफांचा सामना करतानाच राज्याच्या विकासात कसूर न करता राजकीय लढाई लढत राहणं हा समतोल सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही करावा लागत आहे. अशात पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राज्यातल्या सद्यस्थितीबाबत काय वाटतंय. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रगतीची दिशा कशी असेल. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी या नेत्यांचं व्हिजन काय असेल याबद्दल या सर्व नेत्यांशी आज दिवसभर आम्ही दिलखुलास संवाद साधणार आहोत. 


दिवसभर 'माझा'वर दिग्गजांचं 'व्हिजन'


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), राज ठाकरे (Raj Thackeray), आदित्य ठाकरे, जयंत पाटील आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद साधला जाणार आहे. आज दिवसभर एबीपी माझावर 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डलवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' लाईव्ह पाहा :



एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व राजकीय नेते महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी, राज्यातील या दोन मोठ्या पक्षात झालेल्या बंडाळीनंतरची यंदाची विधानसभा ही पहिली निवडणूक आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून ते अगदी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दारी सुरू असलेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षाच्या प्रकरणापर्यंत, अनेक टप्प्यांमध्ये राज्यातील जनतेनं अनेक राजकीय भूकंप पाहिले. 


शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. शिवसेनेत उभी फूट पडली.  महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात न भुतो न भविष्यती असं सरकार सत्तेत आलं, शिंदे-फडणवीस सरकार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचं सरकार. त्यानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगला. एका धक्क्यातून महाराष्ट्र सावतो न सावरतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडली. अजित पवार काही आमदारांसह शरद पवारांची साथ सोडून बाहेर पडले आणि थेट पक्षावर दावा केला, त्यानंतर जे-जे शिवसेनेच्या बाबतीत झालं, ते सगळं राष्ट्रवादीच्या बाबतीत झालं. आता सत्तासंघर्षानंतरची पहिली विधानसभा निवडणूक असल्यामुळे यंदाची निवडणुक अत्यंत चुरशीची होणार यात काही शंका नाही.  


राज्याचा सत्तासंघर्षाचा पेच अद्याप अनिर्णीतच आहे. अशातच यंदाच्या निवडणुकीत प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या तोफा एकमेकांवर डागल्या जाणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच चुरस रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रासाठीचं राज्याचं व्हिजन मांडण्यासाठी राजकीय नेतेमंडळी आज एबीपी माझावर येणार आहेत.