Maha Vikas Aghadi : आज रात्री महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रित उमेदवार जाहीर करणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्ररित्या उमेदवार जाहीर करणार याबाबत निर्णय होणार आहे. जर महाविकास आघाडी म्हणून निर्णय झाला तर उद्या 100 उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबतचा निर्णय आज रात्री महाविकास आघाडी घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रावादी काँग्रेस 85 जागांवर लढण्याची शक्यता आहे. 


जागा वाटपात मोठा आकडा पदरात पाडून घेण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पुन्हा एकदा स्ट्राईक रेट वर भर आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन 85 वर चर्चा झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 85 जागा लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 58 उमेदवार निश्चित


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 58 उमेदवार निश्चित झाले आहेत. या 58 उमेदवारांमध्ये अद्याप अल्पसंख्यांक समुदायाचा एकही उमेदवार नाही.लोकसभेला अल्पसंख्यांक समुदायाने महाविकास आघाडीच्या पदरात भरभरून मतदान केल्याने अल्पसंख्यांक समुदायाला संधी मिळावी अशी शरद पवार पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. सध्या उमेदवार निश्चित झालेल्या 58 विधानसभा मतदारसंघात अणुशक्ती नगर विधानसभेचा समावेश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजूनही पक्षांतर्गत 27 उमेदवार निश्चित होणे बाकी असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. पार्लिमेंट्री बोर्डाच्या बैठकीत आम्ही जागा वाटपाचा अंदाज घेतला असल्याची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.  पुढच्या 2 दिवसात जागावाटप जाहीर  होईल असे कोल्हे म्हणाले. 22 ला उमेदवारी अर्ज भरायला सुरु होणार आहे. मविआला पोषक वातावरण महाराष्ट्रात आहे. त्यात अनेक इच्छुक आहेत. त्यामुळं रस्सीखेच वाढत आहे. मविआ चा स्ट्राईक रेट जास्त असावा हे महत्वाचं आहे. राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट चांगला असणार हे नक्कीच असल्याचे अमोल कोल्हे यावेळी म्हणाले. आमदार आणि कार्यकर्त्यांची भावना आहे पण जागा किती येतील हे देखील महत्वाचं आहे. 


महायुतीवर अमोल कोल्हेंची टीका


महायुतीवर अमोल कोल्हे यांनी टीका केली. त्यांना अद्याप जागावाटपाच्या संदर्भात दिल्लीतून परवानगी आली नसेल. त्यांच्या समोर मान डोलविण्याशिवाय पर्याय नाही.दिल्ली गुबूगुबू वाजवणार असे म्हणत कोल्हेंनी महायुतीवर टीका केली. निष्टवंताच्या पाठीशी आमचा पक्ष ठामपणे उभा असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले. उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधीवर यांच्यावर जनता निष्ठा दाखवणार असल्याचे कोल्हे म्हणाले.