मुंबई : कला, क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांसाठी 10 जानेवारीपासून ओपन एसएससी (सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट) बोर्ड सुरु करण्यात येणार आहे. या बोर्डामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची आवश्यकता नाही. हे विद्यार्थी थेट परीक्षा देऊ शकतात.

शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी हा नवा निर्णय आज जाहीर केला. तावडे म्हणले की, कलाकार, खेळाडू आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी हवा तितका वेळ देता यावा. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ त्यांच्या आवडत्या क्षेत्रात आणि सरावासाठी देऊ शकतात. डिसेंबर आणि जून महिन्यात हे विद्यार्थी थेट परीक्षेला बसू शकतात. नव्या ओपन एसएससी बोर्डांतर्गत विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल.

या विद्यार्थ्यांना वयाच्या दहाव्या वर्षी इयत्ता पाचवीची परीक्षा देता येऊ शकते. वयाच्या 13 व्या वर्षी आठवी आणि वयाच्या 15 व्या वर्षी 10 ची परीक्षा देता येईल. ओपन एसएससी बोर्डाद्वारे या परीक्षा घेतल्या जातील.