Maharashtra Election : राज्यात भाजप पुन्हा नंबर वन, 'देवेंद्र-रवींद्र'च्या जोडीची निवडणूक विजयाची हॅट्रिक
ZP Election Result : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिकल्या आहेत. या विजयामुळे ग्रामीण भागातही आपली पकड मजबूत असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

मुंबई : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर होताच भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा सर्वाधिक जागा पटकावत आपली ताकद सिद्ध केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाने महायुतीतील सहकारी पक्षांपेक्षा तसेच महाविकास आघाडीपेक्षाही अधिक जागा जिंकून राज्यातील जनतेचा कौल आपल्याच बाजूने असल्याचे दाखवून दिले.
या विजयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जोडी सध्या राज्याच्या राजकारणातील ‘जोडी नंबर वन’ म्हणून अधिक ठळकपणे समोर आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक जागा मिळवत अनोखी हॅटट्रिक साधली आहे.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नगर परिषद निवडणुका, त्यानंतर जानेवारीत पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुका आणि आता फेब्रुवारीतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका, या तिन्ही टप्प्यांमध्ये भाजपाने आघाडी घेतली. या यशामागे अचूक निवडणूक नियोजन, प्रभावी प्रचारयंत्रणा, स्थानिक आणि राज्य पातळीवरील समन्वय तसेच कार्यकर्त्यांशी थेट संवाद या घटकांचा मोठा वाटा असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला रवींद्र चव्हाण यांच्या संघटनात्मक कौशल्याची जोड मिळाल्याने पक्षाची यंत्रणा अधिक सक्षम झाली. स्थानिक नेतृत्वाला शीर्षस्थ नेत्यांचा पाठिंबा मिळाल्याने अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा अधिक आणि धक्कादायक विजय नोंदवता आले.
रवींद्र चव्हाण यांना निवडणूक व्यवस्थापनात पारंगत नेता म्हणून ओळखले जाते. निवडणुकीत अत्यावश्यक असणारे साम दाम दंड भेद वापरताना विचारधारेच्या धाग्याने कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जोडणारे असे त्यांचे नेतृत्त्व आहे. कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करणारे आणि संघटन बळकट करण्यावर भर देणारे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची प्रतिमा आहे. दिल्ली आणि नागपूर या दोन्ही सत्ताकेंद्रांशी असलेले त्यांचे घनिष्ठ संबंध तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य या विजयात निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
एकूणच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिन्ही टप्प्यांतील विजयामुळे भाजपाने राज्याच्या राजकारणात आपली पकड अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे.
























