Maharashtra Winter Session : महापुरूषांच्या अपमानावरून विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) अधिवेशनात आज आक्रमक झाले. कोणत्याही महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. जे चुकतील त्यांना कायद्याचा बडगा दाखवा, यांना तुरुंगात टाका, पदावरून हाकालपट्टी करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. अधिवेशनात अंतीम आठवडा प्रस्तावावर अजित पवार बोलत होते. "सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं आहे. मात्र तेव्हापासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघात नथुराम गोडसेचं उदात्तीकरण केलं जात आहे. तेथे बंदुकीचं निशाण असलेला झेंडा फडकवण्यात आला आहे. गृहमंत्र्यांच्या मतदार संघात या गंभीर घटना घडत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. 


Ajit Pawar : 'खोटे गुन्हे दाखल करून अटक करणे योग्य नाही'


"आम्ही मुंबईत मोर्चा काढला कारण महापुरुषांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केली गेली. याचा परिणाम गुंतवणुकीवर होत आहे. राजकीय कुरघोडीने गुन्हे दाखल केले जात आहेत. मागच्या गृहमंत्र्यांची कारकीर्द बघा.
त्यांच्या विभागातील पोलिस आयुक्तांनी आरोप केले आणि त्यांना अटक केली. त्यांच्या आयुष्यातील एवढे दिवस वाया गेले. चांदीवाल आयोगाकडे पुरावे नाहीत म्हणून गेले नाहीत. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या बाबतीत देखील तेच झालं. आरोप सिद्ध झालायानंतर पाहिजे ती शिक्षा करा. मात्र आरोप कराचे आणि अटक करायाची हे योग्य नाही. त्यांच्या कुटुंबीयांची काय अवस्था झाली असेल?, असा प्रश्न अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही तरुण असताना मंत्री झालो. त्यावेळी अनेकांची प्रकरणे आम्हाला दिली जात होती. मात्र, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत होतो." असे अजित पवार यावेळी म्हणाले. 


Ajit Pawar :  मुख्यमंत्र्यांना टोला


"राज्यपाल नेहमी वादग्रस्त बोलत आहेत. मुख्यमंत्री वारंवार दिल्लीला जातात, त्यावेळी ते या संदर्भात बोलू शकतात. आमच्या विरपुरुषांचा अवमान करण्यासाठी तुम्ही विडा उचलला का? गांधी, नेहरू यांच्या विचाराने हा देश पुढे गेला आहे. पहाटे चार वाजता उठता तर नेहरूंची पुस्तक वाचा , असा टोला अजित पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.  


Ajit Pawar :  महापुरूषांच्या अपमानावरून अजित पवार आक्रमक


अजित पवार महापुरूषांच्या सततच्या अपमानावरून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. "मंत्री म्हणतात महापुरुषांनी भिक मागून शाळा सुरु केल्या. त्यावेळी महात्मा फुले यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 20 हजार होता आणि टाटा यांचा 19 हजार होता. शाई फेकल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पत्रकारांवर गुन्हा दाखल केला. नंतर फेस शिल्ड वापरुन फिरायला लागले, असा टोला अजित पवार यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडे शाईचा पेन असेल तर जप्त करा. तुम्ही माझ्या अंगावर शाई फेकाल, आमाहाला विधान भवनात शाई पेन आणायला बंदी आहे, असा टोला देखील अजित पवार यांनी यावेळी लगावला. 


Ajit Pawar :  "कोणीही उठतो आणि महापुरूषांचा अपमान करतो"


"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गनिमी काव्याची तुलना शिवाजी माहाराज यांच्यासोबत केली. शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा हा स्वराज्यासाठी होता, मुख्यमंत्री पदासाठी नव्हता, शिवाय मंत्री बनवण्यासाठी नव्हता. मंगलप्रभात लोढा पहिल्यांदा मंत्री झाले याहेत, ते काही ही बोलतात. एक आमदार बोलतात की शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. एकजण म्हणतात की शिवाजी महाराज यांचा कोथळा अफझल खान यांनी काढला. त्यानंतर चुकून झालं म्हणतात आणि शंभूराजे तुम्ही त्यांचं समर्थन करता. शिवाजी महाराज यांनी माफी मागीतली म्हणता, काय हा निर्लज्जपणा आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अशा वक्तव्यांचा साधा निषेध देखील केला नाही. मुख्यमंत्री नको त्या निष्पाप लोकांना जेलमध्ये टाकण्याच्या ऐवजी या लोकांना जेलमध्ये टाका. त्यांच्या ही डोक्यात प्रकाश पडू द्या, असे अजित पवार यावेळी म्हणाले. 


"गुजराती आणि राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढले तर पैसा उरणार नाही अशी वक्तव्य राज्यपाल करत आहेत. त्यांना एकनाथ शिंदे सरकार अस्थिर करायचे आहे का? असा प्रश्न देखील अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.