Weather Updates : राज्यात तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे थंडी (Cold Weather) तर कुठे ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात पावसाची स्थिती देखील निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याचं चित्र दिसत आहे. नंदूरबारमध्ये  (Nandurbar) तापमानाचा पारा 8.5 ते 9 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे. तर धुळे जिल्ह्यात 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीचा कडाका वाढला असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. 

Continues below advertisement


नंदूरबार जिल्ह्यात कडाक्याची थंडी


नंदूरबार जिल्ह्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये (Satpura Mountain Range) तापमानाचा  पारा चांगलाच खाली आला आहे. तिथे तापमानाचा पारा 8.5 ते 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आहे. तर तोरणमाळ परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. थंडी वाढल्याचा परिणाम मानवी जनजीवनावर होत असल्याचे चित्र दिसत आहे.




धुळे जिल्ह्याचा पारा 11 अंशावर 


धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा 11 अंश सेल्सिअसवर गेला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कडाक्याची थंडी वाजत आहे. या थंडीचा परिणाम हा दिवसभर जाणवत आहे. वाढत्या थंडीमुळं सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या घटली आहे. दुसरीकडं दिवसभर धुक्याची चादर पसरली असल्याने याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान आज तापमानात तब्बल चार अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने वातावरणातील गारठा काही प्रमाणात कमी झाला आहे.


पश्चिम महाराष्ट्रातही पारा घसरला 


पश्चिम महाराष्ट्रातही तापमानाचा पारा घसरला आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यात तापमानाचा पारा 15 अंशावर गेल्यानं हुडहुडी वाढली आहे. तर सांगली आणि कोल्हापूरमध्ये 18 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


नागपूर जिल्ह्यात कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण


नागपुरात आज सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण असल्याने सूर्य दर्शन झालेले नाही. त्यामुळं एका बाजूला थंडी वाढली आहे तर दुसऱ्या बाजूला ढगाळ वातावरण आहे. तर शहरावर धुक्याची चादर पसरली आहे. आज सकाळी सिव्हिल लाईन्स परिसरात उंच इमारतीवरुन नागपूर शहर एखाद्या हिल स्टेशनसारखे दिसत आहे. जमिनीपासून काही उंचीवर दाट धुकं असल्यानं एका इमारतीवरून पुढची दुसरी इमारत दिसत नाही. आज दुपारनंतर सूर्यदर्शन होऊन आकाश निरभ्र होईल असं हवामान विभागाचा म्हणणं असून त्यानंतर किमान तापमान आणखी खाली जाऊन थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. 


गोंदियात दाट धुक्याची चादर 


गोंदिया शहरात मागील दोन दिवसांपासून सकाळी धुक्याचे प्रमाण वाढले आहे. धुक्याची चादर पाहून नागरिकांना आनंद झाला. मात्र, धुक्यामुळे सकाळी काही वेळ वाहतूक संथ झाली आहे. जिल्ह्यात अनेक भागात धुके वाढले असून रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका वाढत असताना सकाळी सर्वदूर धुके दाटले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा शहरात आज सकाळी सर्वाधिक दाट धुके दिसले. समोरचे दिसत नसल्याने वाहतूक संथ झाली होती. सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनी धुक्याचा आनंद घेतला.


हिंगोली जिल्ह्याचा पारा 16 अंशावर 


हिंगोली जिल्ह्यांमध्ये कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. हिंगोलीच्या तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. हिंगोलीचे तापमान 16 अंश सेल्सिअस वर पोहोचल्याने जिल्हाभरात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर जिल्हाभरात सर्वदूर धुक्याची चादर पसरली आहे. या संपूर्ण हवामानाच्या बदलाचा फटका शेतातील पिकांना बसत आहे. हरभरा, गहू, तूर यासह आंब्याच्या फळबागा संकटात सापडल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : राज्यात काही भागात ढगाळ वातावरण, कापसासह 'या' पिकांना फटका बसण्याची शक्यता; शेतकरी चिंतेत