Maharashtra Weather Update: प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यभरात अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्याने एकच धुमाकूळ घातला आहे. यावेळी बरसणाऱ्या पावसामुळे (Maharashtra Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून घेतला आहे. एकीकडे आखातातील युद्धामुळे अधिक महागाईचा भडका उडाला असताना आता बळीराज्यासह सर्वसामान्यांनाही या हवामान बदलाचा फटका बसण्याची भीती आहे.(Maharashtra Unseasonal Rain)
Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा मराठवाड्याला तडाखा; 122 गावांतील 5 हजार 409 शेतकऱ्यांना फटका
मराठवाड्यात मागील दोन दिवसांत झालेल्या गारपीट, अवकाळी पावसामुळे 122 गावांतील 5 हजार 409 शेतकऱ्यांना फटका बसला असून, 3 हजार 261 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक 2 हजार 665 हेक्टरवरील नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. यापूर्वीही झालेल्या अवकाळीचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यालाच बसला होता. मराठवाड्यात 18, 19 आणि 20 मार्च रोजी गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. या तीन दिवसांच्या पावसात तब्बल 12 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झाले नसताना सोमवारपासून पुन्हा अवकाळीने मराठवाड्याला तडाखा बसला.
Marathwada Rain : 3 हजार 261.52 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, 49 जनावरांचा मृत्यू
दरम्यान, 30 आणि 31 मार्चपासून पावसामुळे विभागातील 122 गावांतील 5 हजार 409 शेतकरी बाधित झाले. 3 हजार 261.52 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात 827.05 हेक्टर जिरायत, 1253.80 बागायत तर 1180.67 हेक्टर फळबागांचा समावेश आहे. यात सर्वाधिक 2 हजार 665.00 हेक्टर नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आहे. तर जालना येथील दोघांचा तर बीड येथील एकाचा बळी अवकाळी पावसाने घेतला. जालना जिल्ह्यात एकजण जखमी झाला आहे. विभागातील 25 मोठी, 9 लहान दुभती जनावरे, तर ओढकाम करणारी 13 मोठी आणि 2 लहान जनावरांचा अशा एकूण 49 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात बुधवारी रात्री साडेदहा वाजल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मका, बाजरी, गहू, केळी यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही ठिकाणी फळबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. धरणगाव तालुक्यातील चांदसर परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काढणीवर आलेला मका पूर्णपणे भुईसपाट झाला आहे. कापसाला योग्य भाव न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी मक्याकडे वळण घेतले होते. मात्र काढणीच्या उंबरठ्यावर असताना आलेल्या या अवकाळी पावसामुळे “हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला,” अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान वाढतच आहे. दोन दिवसांपूर्वी सुमारे नऊ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली होती, तर कालच्या पावसानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे,
Washim Rain : वाशिम जिल्ह्यात वादळी वारा आणि पावसामुळे बिजवाई कांद्याचे नुकसान
वाशिम जिल्ह्यात वाशिम,मालेगाव आणि रिसोड तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे बिजवाई कांद्याच नुकसान झाल्याच समोर आलय... रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे बीजवाई कांद्याच नुकसान झाल असून कांदा पूर्णपणे आडवा पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा हिरावून घेतलाय, त्यामुळं शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
