पुणे: राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. विदर्भातही गेल्या 3 दिवसांपासून चांगला झाला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाने नाले, नद्या दुधडी भरून वाहत आहेत, तर काल(मंगळवारी) झालेल्या पावसाने अनेक शहरी भागात वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, त्याचबरोबर अनेक ठिकाणी  पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता (Heavy Rain) वर्वण्यात आली आहे. 


आजही राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आले आहेत. नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर, अकोला या सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने राज्यात पुढील 4 दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील भर पडली आहे. तर आज पुण्याला रेड अलर्ट (Red alert in pune) जारी करण्यात आला आहे.


रेनकोट, छत्री घेऊनच बाहेर पडा


आज बुधवारी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज (दि. २५) पुण्यासह घाटमाथ्यावर आणि संपूर्ण जिल्ह्याला 'रेड अलर्ट' दिला आहे. त्यामुळे पुणे शहरातही सावधानतेचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. शहरात 60 ते 100 मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, 26 व 27 रोजी शहरात 'यलो अलर्ट' म्हणजे 20 ते 30 मिमी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे. 


आगामी तीन-चार दिवस महाराष्ट्रात आणि पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.


नैऋत्य मॉन्सूनचा पाऊस राजस्थान व पंजाबच्या काही भागातून परतला आहे. 26 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. राज्यात पुढील तीन-चार दिवस विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाला सुरवात


अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. विजेच्या कडकडाटासह जोरदार वारा आणि पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. हवामान खात्याने तीन दिवस नगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आलं आहे.