पुणे : राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारपासून (१६ मार्च) शाळांच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, राज्याच्या काही भागांत उष्णतेची लाट (Maharashtra Weather Update) असतानाच विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचे सावट घोंघावत आहे.(Maharashtra Weather Update)

Continues below advertisement

शाळा आता भरणार सकाळी ७ वाजता

शनिवारी राज्याच्या अनेक भागांत उन्हाचा पारा ३८ अंश सेल्सिअसच्या पार पोहोचला होता. दुपारच्या सत्रात वाढणाऱ्या उष्णतेमुळे विशेषतः प्राथमिक शाळेतील चिमुकले विद्यार्थी अस्वस्थ होत आहेत. अनेक ग्रामीण शाळांचे छप्पर लोखंडी पत्र्याचे असल्याने दुपारच्या वेळी वर्गात बसणे असह्य होत होते.(Maharashtra Weather Update)

या परिस्थितीचा विचार करून, सकाळी ९:३० ते दुपारी ४ या वेळेत भरणाऱ्या शाळा आता सकाळी ७ ते दुपारी १२:३० या वेळेत भरवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. शिक्षक संघटनांनी केलेल्या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Continues below advertisement

 कुठे 'हिट वेव्ह' तर कुठे पाऊस

राज्यातील हवामानात सध्या मोठी अस्थिरता जाणवत आहे. हवामान विभागाने आज, १५ मार्च रोजी विसंगत हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट (Hit Wave) कायम आहे. मुंबईत आर्द्रता जास्त असल्याने उकाडा जाणवेल, मात्र पावसाची शक्यता नाही. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना वादळी पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. पुण्यात हलक्या पावसाची शक्यता असून पुढील २-३ दिवस संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पावसाचे वातावरण राहील.अकोला आणि अमरावतीत उष्णतेची लाट असतानाच उर्वरित विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. १७ ते २० मार्च दरम्यान विदर्भात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यांनाही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकरी चिंतेत

उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी टंचाई भासत असतानाच आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या अंदाजामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी धान्य साठवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Heat wave: काय करावं ?

• पुरेसे पाणी प्या, तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.• उन्हात काम करत असल्यास ओल्या कपड्याने  डोके मान चेहरा झाकून ठेवा. सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळावा.• टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी व स्थानिक उपलब्ध पाणीदार फळे आणि पाणीदार भाज्या यांचा आहारात समावेश करा.• घर थंड ठेवण्यासाठी खिडक्यांना पडदे लावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवा आणि गारव्यासाठी पंखे किंवा ओल्या कपड्यांचा वापर करा.• हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.• घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपीचा आणि गॉगल वापर करा.• ओआरएस (ORS), घरी बनवलेली लस्सी, कोशिंबीर, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी किंवा ताक यांचा नियमित आहारात वापर करा. 

Heat wave: काय करू नये ?

• दारू, चहा, कॉफी आणि कार्बनिटेड थंड पेये किंवा जास्त साखर असलेली पेये घेऊ नका, कारण त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकते.• उन्हात अतिश्रमाची किंवा शारीरिक कष्टाची कामे करणे टाळा.• उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाणे टाळा.• दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर पडू नका. छतावर जाऊन नका किंवा वरच्या मजल्यावर थांबणे टाळा.• गडद रंगाचे, घट्ट किंवा जाड कपडे घालणे टाळावे.• बाहेर जाताना अनवाणी जाऊ नका; नेहमी शूज किंवा चप्पल वापरा.• उन्हाच्या कालावधीत बंद ठिकाणी स्वयंपाक करणे टाळावे.