Maharashtra weather update: राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे कोकण मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भातही अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. (Weather Update) मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता अधिक झाल्यामुळे राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. पूर्व विदर्भासह मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.
घाटमाथ्यावरही सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार त्यातील मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत महाराष्ट्रभर पावसाचा जोर वाढणार असून कोकण किनारपट्टीसह नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावर पावसाचे हायअलर्ट देण्यात आले आहेत. आज (23 जुलै) पालघर, नाशिक व पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. मुंबईसह उपनगरात पावसाचे ऑरेंज अलर्ट असून उत्तर महाराष्ट्र व संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाचा इशारा काय ?
बंगालच्या उपसागराकडून अरबी समुद्राकडे येणाऱ्या चक्राकार वाऱ्यांची तीव्रता वाढल्यामुळे तळ कोकणासह मुंबई उपनगर आणि संपूर्ण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील 24 तासांत राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने राज्यभर पावसाचे विविध अलर्ट जारी केले आहेत. उत्तर कोकण, लगतचा उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या काही भागांवर सध्या दाट ढगांची चादर पसरली आहे.या भागांत पुढील ३ ते ४ तासांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 23 ते 24 जुलै रोजी पूर्व विदर्भात मुसळधार पावसाच्या शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सर्वदूर पाऊस होऊ शकतो. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील तीन तासात धाराशिव, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काल मराठवाड्यात बऱ्याच प्रतिक्षेनंतर सर्वदूर पावसाने हजेरी लावली. छ. संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली धाराशिव भागात पावसाचा जोर वाढला होता.
पालघर जिल्ह्यात रात्रभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने दाणादाण उडाली होती. काल संध्याकाळ पासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. रस्ते जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नाशिक घाटमाथासह पुणे घाटमाथ्यालाही आज रेड अलर्ट कायम आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सातारा घाट माथ्यावर ही जोरदार पावसाची शक्यता आहे. तळ कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर घाटमाथ्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार नाशिक जळगाव या जिल्ह्यांसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
