Maharashtra Weather Update: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गुलाबी थंडीत पावसाच्या धारांनी वातावरणात बदल झाला आहे. दक्षिण मुंबई ते तुलनेने जोरदार पाऊस झाला. तर उपनगर आणि नवी मुंबईत हलक्या सरींनी हजेरी लावली होती. भारतीय हवामान खात्याने उत्तरेकडील राज्यांना थंडीच्या लाटेचा इशारा दिलाय. तर दक्षिणेत तमिळनाडू, पुद्दुचेरी या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होणार असून पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 1 ते 2 अंशांनी तापमानात वाढ होणार आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

काल अहिल्यानगर 12.3, जळगाव 9.2, कोल्हापूर 17.1, महाबळेश्वर 13.5, पुणे 13.5, सांगली 16.4, सोलापूर 18.2, छत्रपती संभाजीनगर 13.8, धाराशिव 12.4, अकोला 15, अमरावती 14.5, बुलढाणा 15.6, तर मुंबई 20.6, मुंबई सांताक्रुज 19.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

हवामान विभागाचा अंदाज काय? 

हवामान विभागानुसार, अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वारे आणि पश्चिमेकडून येणारा थंड हवामानाचा प्रभाव यामुळे मुंबई सह राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं आहे. नवीन वर्षाच्या पहिलाच दिवशी मुंबईत पावसाचा जोरदार सडाका येऊन गेल्यामुळे कामावर निघालेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ झाली होती. पण आता उत्तरेकडील राज्यांमध्ये असणारी थंडीची लाट आणि दक्षिणेकडे तमिळनाडू व इतर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता यामुळे महाराष्ट्रात तापमान पुन्हा बदलणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असून त्यानंतर तापमानात चढउतारच असेल असा अंदाज देण्यात आलाय.

Continues below advertisement

प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार,पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हळूहळू कमाल तापमान वाढणार आहे. पुढील 24 तासात महाराष्ट्रात किमान तापमानात फारसा फरक होणार नसला तरी नंतर एक ते दोन अंशांनी वाढ होऊन पुन्हा 2 ते 4 अंशांनी तापमान घसरणार आहे. येत्या 24 तासात विदर्भात फारसा बदल नसला तरी कमाल तापमान दोन अंशांनी वाढणार असल्याचा सांगण्यात आलंय. मुंबईत जरी नव्या वर्षात पाऊस पडला असला तरी उर्वरित महाराष्ट्रात गारठा चांगलाच वाढला आहे.

विदर्भ-मराठवाड्यात गारठा वाढणार

विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका आधीपासूनच वाढलेला आहे. नागपूरसह विदर्भात यंदाचा डिसेंबर गेल्या काही वर्षांतील सर्वात थंड ठरला आहे. मागील दोन आठवड्यांपासून अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवलं जात आहे. पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही गारठा कायम राहणार असून तापमान 1-2 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात तापमानात मोठी घसरण

राज्यातील अनेक जिल्ह्यांत किमान तापमानात गेल्या काही दिवसांत मोठी घट नोंदवली जात आहे. परभणीमध्ये सर्वात कमी 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर धुळ्यात तापमान 7 अंशांपर्यंत घसरलं होतं. आता तापमान 1-2 अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI