पुणे: आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. शनिवारी सायंकाळपासून राज्याच्या बहुतांश भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून हवामान खात्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील 48 तास गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान खात्याने या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
18 जूनपर्यंत कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात रायगड, रत्नागिरीला अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबई, ठाण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तिकडे कोकणातही जोरदार पाऊस सुरू आहे. रायगडला पावसानं चांगलच झोडपलं आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये तुफान पाऊस पडतोय. माणगावमध्ये अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. गोरोगाव जवळील नागावमध्ये घरांमध्ये पाणी साचलं आहे. लोणेरे भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. तिकडे गुहागरमधील पालशेतमध्ये नदीला पूर आल्यानं आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरलंय. रत्नागिरीच्या परशुराम घाटात रस्त्यावर पाणी साचल्याने प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. तर आडिवरे गावात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने महाकाली मंदिरपरिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. तर रायगडच्या माणगाव, महाड, रोहा शहराला काल पावसाने झोडपलंय.
रत्नागिरीला रेड अलर्ट; मुंबईला यलो अलर्ट
मान्सूनच्या प्रवासात प्रगती नसली तरी राज्याच्या बहुतांश भागात, विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्टयात काही ठिकाणी मात्र तो कोसळत आहे. पावसाचा हा ट्रेंड असाच सुरू राहणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने रविवारी रत्नागिरीला तर सोमवारी सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून आणि मुंबईला येलो अलर्ट आहे. त्यामुळे मुंबई वगळता उर्वरित जिल्ह्यांत पावसाचा अंदाज कायम आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश पावसाचे दृश्य दिसत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
15 जून रोजी मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासात काही भागांत गडगडाटासह पावसाचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. नवी मुंबई व ठाणे भागात रविवारी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागात दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.