Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुटं उन्हाचा तडाखा जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात नेमकं कसं वातावरण राहील याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. पुढील आठवडाभर राज्यात अवकाळीचे वातावरण राहणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
26 जिल्ह्यात पावसाची शक्यता
ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, नगर पुणे सातारा सांगली सोलापूर, धाराशिव बीड नांदेड, गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती अशा 26 जिल्ह्यात उद्या शनिवार दिनांक 3 ते 10 मे पर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ ठिकाणी एखाद्या- दुसऱ्या दिवशी वीजा, वारा व गडगडाटीचे वातावरण राहून, झालाच तर अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी विशेष असे घाबरून जाऊ नये. केवळ सावधानता बाळगावी असे खुळे म्हणाले.
तापमानात चढ उतार
या वातावरणाचा प्रभाव विदर्भातील 7 जिल्ह्यात विशेष जाणवू शकतो, तसेच एखाद्या दुसऱ्या दिवशी किरकोळ गारपीटीचीही शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. सध्या महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान 38 डिग्री तर काहीं ठिकाणी विशेषतः छत्रपती संभाजीनगर, धाराशिव ह्या जिल्ह्यात 40 डिग्रीच्या दरम्यान जाणवते. सदरचे तापमान जळगाव, जेऊर सोलापूर अकोला अमरावती वर्धा ब्रम्हपुरी वगळता जवळपास सरासरी इतकेच जाणवत असुन उद्या पासूनच्या आठवड्यात महाराष्ट्रात हे तापमान अजुन एखाद्या दोन डिग्रीने खालावण्याची शक्यता आहे. उन्हाची ताप त्यामुळे अधिक सुसह्य जाणवेल, असे वाटते. दरम्यान, सध्या अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे जात असल्याचे चित्र देखील दिसत आहे.
अवकाळीचे वातावरण कशामुळं तयार झाले?
सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत नसल्याचे खुळे म्हणाले. दरम्यान, अरबी समुद्रात दिड किमी उंचीपर्यंत घड्याळ काटा दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी 45 ते 50 किमी वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल समजावा असे खुळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: