Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल (Climate change) होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. वातावरणात कमालीचा चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात (Maharashtra) उद्यापासून (4 मार्च) 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवली आहे. कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


Rain : 'या' भागात पावसाचा अंदाज 


राज्यातील विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कोकण आणि विदर्भात सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण उन्हाळा सुरु होण्याआधीच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.


Weather Update : उकाड्यापासून दिलासा मिळणार नाही


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात सहा मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकण देखील पावसाची शक्यता कायम आहे. मात्र, अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे. औरंगाबादेत देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील कमाल तापमानात घट होण्याचं चित्र नाही. सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पाऊस अतिशय कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज असल्यानं उकाड्यापासून दिलासा मिळणार नाही. 


फेब्रुवारी महिन्यात पुण्यात 147 वर्षांतील सर्वाधिक तापमान


भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं आहे. येत्या काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसांत शहराचे तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असं आयएमडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. देशाच्या उत्तरेकडील भागातून उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहताना वाऱ्याची दिशा बदलल्याने तापमानात अचानक वाढ झाली आहे. अशातच आता राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Pune Temperature : पुणेकरांनो स्वत:ला जपा! फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद; उष्णतेच्या लाटेचा इशारा