Maharashtra Weather : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली आहे. दरम्यान, 
उद्यापासून (शनिवार 11 नोव्हेंबर) महाराष्ट्रात (Maharashtra) ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता आहे. तर दुपारचे कमाल तापमान सामान्य राहून हळूहळू पहाटेच्या गारव्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केले.  


 मुंबईसह संपूर्ण कोकणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता


ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह संपूर्ण कोकणात उद्या ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यात तर पुढील पाच दिवसही म्हणजे गुरुवार 16 नोव्हेंबर पर्यंत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता कायम असल्याचे खुळे यांनी सांगितले. येत्या काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागारात चक्रीय वाऱ्याची स्थितीतून जरी कमी दाब क्षेत्राच्या निर्मितीची शक्यता असली तरी महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात मात्र कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता जाणवत नाही. तर 17 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात हळूहळू थंडीची चाहूल लागू शकते असे खुळे यांनी सांगितले.


'या' भागात पावसाची हजेरी


मुंबईत गुरुवारी सायंकाळी अचानक झालेल्या पावसाने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच, दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहक, विक्रेत्यांचीही धावपळ झाली. मुंबईतील पश्चिम उपनगरे तसेच मध्य उपनगरात रात्री 8 नंतर अचानक पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पुढील 2 दिवस मुंबईसह उपनगरात पावसाची शक्यता आहे. मागील दोन दिवसापासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस बरसत आहे. पुढील दोन दिवसही या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात पडत असलेल्या पावसामुळं आंबा पिकांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मागील वर्षी नोव्हेंबर आणि  डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं आंब्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही मागील दोन दिवसापासून होत असलेल्या पावसाने शेतकरी देखील चिंतेत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Weather Update: कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीत जोरदार पावसाची शक्यता, ऐन दिवाळीत अवकाळीचं सावट