मुंबई : राज्यात आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (Gudi Padwa 2024) अवकाळी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजनुसार, राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता (IMD Rain Prediction) कायम आहे. आज मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी


हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या भागात हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही आयएमडीकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागातही आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.






मुंबईतील तापमान कसं असेल?


राज्यात इतर ठिकाणी पावसाची शक्यता असली तरी मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसणार आहे. किनारपट्टी भाग वगळता राज्यात इतर अनेक ठिकाणी आज पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील 24 तासांत आकाश निरभ्र आणि कोरडं वातावरण पाहायला मिळेल. मुंबई शहर आणि उपनगरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 23°C च्या आसपास असेल. सोमवारी नाशिक येथे 17.1  °C हे सर्वात कमी किमान तापमान होते. तर सोलापुरात सर्वाधिक 42.2°C तापमानाची नोंद  झाली आहे.


वाढत्या उष्णतेपासून किंचित दिलासा


देशाच्या हवामानात बरेच बदल पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता बळावली आहे. दिल्लीतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आठवड्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओदिसामध्ये 9 एप्रिलपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 11 ते 17 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता कमी असेल. त्यानंतर तापमान वाढ होऊन सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


जूनमध्ये येणाऱ्या पावसाला विलंब होण्याची शक्यता, अती गारपीट किंवा पाऊस झाल्यास परिणाम काय?