पुणे : राज्याच्या काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे, अशातच राज्यात मंगळवारी मान्सून सक्रिय झाला असून, पुन्हा संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा, तर विदर्भ, मराठवाड्याला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरामध्ये सध्या चक्रवाताची स्थिती सक्रिय आहे. पुढील 24 तासांमध्ये वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा किनारपट्टीसह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात वाढलेला पावसाचा जोर सप्टेंबरच्या सुरुवातीलाही कायम राहणार आहे. हवामान विभागाने सप्टेंबरमध्ये देशात दीर्घकालीन सरासरीच्या 109 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभरात पावसासाठी अनुकूल हवामान झाले असून, ३ सप्टेंबर रोजी कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे दक्षतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार सरींचा अंदाज देण्यात आला असून, सतर्कतेचा यलो अलर्ट लागू आहे.
घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील २४ तासांत ०.३ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील २४ तासांत पुण्यात विजांसह पावसाची शक्यता असून, यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात मागील २४ तासांत ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासांत घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मागील २४ तासांत ५ मिमी पावसाची नोंद झाली असून, कमाल तापमान २३.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील २४ तासांत तापमान २७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने जोर पकडला असून, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यांवर मुसळधार सरींची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर काही भागांत पावसासोबतच भाद्रपदाचे ऊन तापमान वाढवत आहे.