Weather Update Today: गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने राज्यभर थैमान घातलं असून मराठवाड्यासह ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही राज्यभरात पावसाला पोषक वातावरण असून बहुतांश भागात पावसाचा ' यलो अलर्ट ' देण्यात आला आहे. कोकणपट्टीसह पुणे, नगरसह मराठवाड्यात आज पावसाची दमदार हजेरी लागणार आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
सध्या चक्राकार वाऱ्यांचा प्रवाह विदर्भ आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरावर ईशान्य बाजूकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यभरात पावसाला पोषक परिस्थिती तयार झाली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकण गोवा उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज काय?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज विदर्भातील काही जिल्हे वगळता संपूर्ण राज्यभर पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. उत्तर महाराष्ट्रातून पाऊस हळूहळू कमी होणार असून शनिवारपर्यंत पावसाचा जोर ओसरेल. पाहूयात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
17 सप्टेंबर: रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजी नगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड अमरावती नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
18 सप्टेंबर: सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे सातारा नाशिक अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिप व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याला येलो अलर्ट.
19 सप्टेंबर: नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना परभणी, लातूर धाराशिव सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट
20 सप्टेंबर: बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता.
ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांत लाखो हेक्टर पाण्यात
महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये राज्यात पावसाचे थैमान चालू असून, पुर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील 1,785,714 हेक्टर (4,284,846 एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या काळात प्रामुख्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून, सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासोबतच भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद यांनाही मोठा फटका बसला आहे.