कोकण किनारपट्टीसह पुणे सातारा घाटमाथ्यावरही जोरदार सरींची शक्यता, नंतर उघडीप; पुढील 2 दिवस हवामान कसे
mahrashtra weather update: आता राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.

Maharashtra weather update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाच्या जोरदार हजेरीमुळे कोकण किनारपट्टी विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक भागात अतिवृष्टी नोंदवली गेली. आता पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. अनेक भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, आज (13 जुलै) रोजी कोकण किनारपट्टीसह कोल्हापूर ,सातारा ,पुणे, नाशिक घाटमाथ्यावर पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ व मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने तसे इशारे या भागांना दिले आहेत.
हवामान विभागाचा इशारा काय?
सध्या मान्सूनचा आस असणारा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सक्रिय असून राजस्थान पासून ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज विदर्भातील नागपूर अमरावती भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी हजेरी लावणार असून जळगाव, नाशिक,छत्रपती संभाजीनगर ,जालना जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. आता राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी 30-40 किमी असून हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे.
पुढील दोन दिवस हवामान कसे?
राज्यात सोमवारी (14 जुलै) रोजी कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीला येलो अलर्ट देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर सातारा व पुणे घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडणार आहे. अहिल्यानगर छत्रपती संभाजी नगर जळगाव धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आले आहेत.
15 व 16 जुलै रोजी राज्यभरात पावसाचा जोर ओसरणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद होईल. 15 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही जोरदार पावसाचा यलो अलर्ट आहे.























