पुणे: राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर काही भागांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात पुढील काही तासांंमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

रायगड जिल्ह्यात पुढील काही तासांंमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण रायगड मधील म्हसळा तालुक्याला जोरदार पावसाने झोडपलं असून म्हसळा मधील ढोरजे पूल पाण्याखाली गेला आहे. म्हसळा तालुक्यात सकाळपासून तुफान पाऊस सुरू आहे.नम्हसळा तालुक्यातील ढोरजे गावाला जोडणारा छोटा पूल ओढ्याच्या पाण्यात वाढ झाल्यामुळे पाण्याखाली गेल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे. तर म्हसळा दिघी मार्गावर देखील पाणीच पाणी  साचल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सकाळपासून काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षिण रायगड मधील म्हसळा श्रीवर्धन तालुक्यात सुद्धा पावसाने सकाळपासून झोडपल्याचं दिसून येत आहे.

रायगडातील 6 तालुक्यांना सुट्टी

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनंतर रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्ह्यातील माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 15 जुलै 2025 रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. वाढत्या पावसामुळे काही भागातील नद्यांना पूर आले असून, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस दोडमार्ग मध्ये 123, सावंतवाडी 114 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 14 तासांपासून कुडाळ मधील माणगाव खोऱ्यातील 25 गावातील वीज पुरवठा खंडित आहे.

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. या भागात चक्री वाऱ्यांचा जोर वाढण्याची शक्यता असून नद्या व नाले ओसंडून वाहण्याचा धोका आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस

पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विशेषतः घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची शक्यता असून काही सखल भागांत पाणी साचू शकते. नाशिक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे हवामान खात्याचे आवाहन आहे.

मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस

औरंगाबाद, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान ढगाळ राहील. वादळी वाऱ्यांपासून फळबागा आणि पीकांचे संरक्षण करण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भात रेड अलर्ट; नागपूर-गोंदियात अतिमुसळधार पावसाचा इशारा

विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड व येलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः नागपूर व गोंदियात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.