पुणे: राज्यभरात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचं दिसून येत आहे. आज (3 जुलै) राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड, आणि सिंधुदुर्गात जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. यादरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान काल दुपारनंतर या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रभर पावसाची हजेरी दिसली. पण पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली असून सध्या कोसळणारा पाऊस हा जोरदार सरींवरती आहे. अद्याप तरी या पावसाचा जनजीवनावरती कोणताही परिणाम झाला नाही. पावसामुळे मात्र भात शेतीच्या लावणीच्या कामांना वेग येणार आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट
कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पालघर, ठाणे, मुंबई या तिन्ही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा या तिन्ही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्याच्या विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वातावरणात गारवा निर्माण होणार असला, तरी सध्या पावसाचा जोर कमी असल्याने कुठल्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, काही निवडक भागांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही पावसाचे प्रमाण मध्यम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर येथेही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, नाशिकच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुण्याला रात्रभर पावसाने झोडपले
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. मात्र, काल (बुधवारी, ता 2) पुणे शहरांसह घाटमाथ्यावर पावसाने रात्री जोरदार हजेरी लावली. घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. रात्री 12 वाजल्यापासून 6451 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.