मुंबई: राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर (Heavy Rain) अधिकच वाढला आहे. भारतीय हवामान विभाग आणि महासागर माहिती सेवा केंद्राने लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच पूरपरिस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर  मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy Rain) पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गोदावरी नदीला पूर, जलसाठ्यात वाढ

सध्या गोदावरी नदीसह अनेक नद्यांना पूर आला असून धरणांमधील जलसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाच्या या जोरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी; वाहतूक ठप्प

गेल्या 24 तासांमध्ये (20 जून 2025 सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 41.7 मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही 41.6 मिमी, रायगडमध्ये 40.1मिमी आणि मुंबई उपनगरात 31.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरीतील खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी आल्याने काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

पुरामुळे रस्ते बंद, दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली

– बोरघर वावे तर्फे नातू चिंचवली रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद– वनोशी अंगणवाडी पन्हाळे फणसूर रस्त्यावरील पूल जलमय– चिंचगर कोरेगाव भैरवी रस्त्यावरही पूर– राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वर दरड कोसळून वाहतूक ठप्प, मात्र नंतर दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली

पुणे घाटात ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने पुणे घाट परिसरात शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई व उपनगरांत हलक्या सरींचा अंदाज

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाचा अनुभव येईल. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.

घाटमाथ्यावरही अलर्ट जारी

मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक आदी घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये येत्या 23 आणि 24 जून रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 21 जून रोजी पावसाची शक्यता असली तरी 22 जूननंतर या भागांत पावसाचा जोर कमी होईल. नांदेड, परभणी, हिंगोलीसह अन्य काही जिल्ह्यांत हलक्या सरींची  शक्यता आहे.