Weather Update: राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. नदी-नाल्यांचा पाण्याचा स्तर धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत नाशिक घाट, पुणे घाट, रायगड आणि चंद्रपूर या भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Rain Update)
राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे .विदर्भाला आज पावसाचा तीव्र अलर्ट देण्यात आले असून नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे . अमरावती, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून संपूर्ण कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय .
वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, केंद्रीय जल आयोगाकडून (CWC) अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मागणीनुसार SDRF चे पथक तैनात करण्यात आले असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यातही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. आज सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, 15 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
काल या जिल्ह्यातील 21 रस्ते बंद होते, त्यापैकी काही मार्ग पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. मात्र, देवरी तालुक्यातील 12 मार्ग अद्यापही बंद आहेत.गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरण तुडुंब भरल्याने पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून 11,382 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. परिणामी बाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
गडचिरोलीत गावांना सतर्कतेचा इशारा
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नदी इशारा पातळीवर पोहोचली आहे. गोसीखुर्द प्रकल्पातून 4.56 लाख क्युसेक आणि चीचडोह धरणातून 3.66 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे परिसरातील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील शेतशिवाऱ्यांमध्ये पाणी साचल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेंदूरजना बाजार येथील शेतकरी जितेंद्र चौधरी यांच्या शेतात पूर्णतः पाणी साचलं असून, अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये प्रशासन सतर्क असून, पावसाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
हेही वाचा