Maharashtra Weather Update: राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना तीव्र उन्हाचा फटका बसत असताना अवकाळी पावसाने एकच दाणादाण उडवली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अशातच आता विदर्भाला हवामान विभागाने एक महत्वपूर्ण अलर्ट जरी केला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, विदर्भातल्या अकोला (Akola), अमरावती (Amravati) आणि वर्धा (Wardha) या तीन जिल्ह्यासाठी नागपूर वेध शाळेने (IMD) उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जाहीर केला आहे. या तीन जिल्ह्यातील नागरिकांनी दुपारच्या वेळेला घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
दुसरीकडे, या व्यतिरिक्त नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या पाच जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या विदर्भातील नागरिकांना उष्णेतीची लाटेसह, अवकाळी पाऊस आणि उकाडा अशा दुहेरी त्रासाचा सामना करावा लागणार आहे.
Amravati : अमरावतीसह ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा बंद
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील तब्बल 18.81 कोटी रुपयांची प्रलंबित देयके न मिळाल्याने अमरावती जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशनने देयकांच्या मागणीसाठी 6 मे पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आठ दिवस उलटून अद्यापपर्यंत अधिकारी किंवा शासनाने आंदोलनाची कुठलीही दखल घेतलेली नाही. परिणामी कंत्राटदार असोसिएशनने आंदोलन तीव्र केले असून आजपासून पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे बंद करण्याचा इशारा दिला होता. आता सगळे असोसिएशनचे कंत्राटदार आणि त्यांचे कर्मचारी आंदोलनस्थळी व्हॉल्व ऑपरेशन स्पॅणर घेऊन दाखल झाले आहे.
'आमचे 18 कोटी रुपयांचे देयके मिळत नाही तोपर्यंत आम्ही अमरावती शहरात पाणीपुरवठा सुरू करणार नाही,' असा इशारा सरकारला दिला आहे. या आंदोलनाचा अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 354 गावातील आणि अमरावती शहरासह दर्यापूर, अंजनगाव सुर्जी आणि चिखलदरा शहराचा देखील पाणीपुरवठा आजपासून बंद करण्यात आला आहे. सरकारने तातडीने देयके देऊन तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.
Gondia News : वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाचा धान पिकाला मोठा फटका
गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सायंकाळच्या वेळेस वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या रब्बी हंगामातील धान पिकाला सगळ्यात जास्त नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्याला याचा फटका बसला असून जवळपास 3000 शेतकरी यांचे 1473 हेक्टर वरील धान पिकाला नुकसान झाले. पुन्हा गेल्या दोन-तीन दिवसापासून काही तालुक्यात आलेल्या वादळी वारा आणि गारपिटेमुळे अजून या नुकसानामध्ये भर पडणार आहे. त्यामुळे एका बाजूला हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला पुन्हा या गारपिटी आणि वादळ वाऱ्याचा मार सहन करावा लागत आहे. सध्या या नुकसानीचे पंचनामे हे कृषी विभाग, ग्रामविकास विभाग आणि महसूल विभागाद्वारा संयुक्त रित्या करण्यात येत आहेत आणि यानंतरच अंतिम अहवाल शासनाला पाठवून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी सांगितले आहे...
Monsoon Update : 6 जून रोजी कोकणात मान्सूनचे आगमन होणार
भारतीय हवामान खात्याने (IMD)नैऋत्य मान्सून आगमनचा अंदाज वर्तवला आहे. अनुकूल हवामान परिस्थिती असल्याने 6 जून रोजी कोकणात मान्सूनचे आगमन होणार असून, त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागरातील काही भाग आणि निकोबारांच्या बेटांवर पुढील 48 तासात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे केरळ आणि राज्यात देखील मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे. (Monsoon Update)
IMD ने यापूर्वी 19 मे पर्यंत मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. यानंतर 31 मे पर्यंत मान्सून देशाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये पोहोचेल, अशी माहिती दिली आहे. यामुळे राज्याच्या इतर भागात मान्सूनच्या आगमनाबाबत उत्सुकता असल्याचे आयएमडी अधिकाऱ्यांनी सांगितले.
इतरमहत्वाच्याबातम्या
