Maharashtra Weather: नवीन वर्ष सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक असताना राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. उत्तरेकडील शीतलहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहेत. राज्यभर थंडीचा कडाका वाढलाय. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गारठा अधिक वाढतोय. दिवसा काही काळ उबदारपणा जाणवत असला, तरी एकूणच थंडीचा प्रभाव कमी झालेला नाही. (cold temperature)
IMDच्या ताज्या अंदाजानुसार, डिसेंबरअखेर वाऱ्यांच्या दिशेत बदल होण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम तापमानावर होऊ शकतो. रविवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मात्र, कोरड्या हवामानासोबतच थंडीचा जोर राज्याच्या अनेक भागांत कायम राहणार आहे. .
उत्तेरेकडील शीतलहरींचे प्रभाव, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, उत्तर भारतात सक्रिय झालेल्या तीव्र थंडीच्या लाटेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. त्यामुळे सकाळी लवकर घराबाहेर पडणारे नागरिक, शेतकरी आणि कामगार वर्गाला कडाक्याच्या गारठ्याचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये 1 जानेवारी 2026 पर्यंत दाट धुक्याचा इशारा दिला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील काही भागांत पहाटे धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळू शकते. विशेषतः महामार्गांवर आणि ग्रामीण भागांत वाहनचालकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
तापमान घसरणार
मराठवाड्याच्या अंतर्गत भागांमध्ये, विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुण्यासह मध्य महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणी किमान तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचा अंदाज आहे. पुण्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून सकाळच्या वेळेत विरळ धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रातही तापमानात पाहते आणि संध्याकाळनंतर तापमान घटताना दिसले. येत्या 7 दिवसात राज्यातील हवामान कोरडे राहणार असून नवीन वर्षात नागरिकांना गारठा जाणवू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा: