मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी चिपळूणमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. तासभर पडलेल्या पावसामुळे चिपळूणमध्ये सखल भागात पाणी साचलं आहे. विजांच्या कडकडटासह चिपळूणमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी साचलं आहे. पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणात शेतकऱ्यांनी भाताच्या पेरणीला सुरुवात केली आहे.
कोकणातील शेतकरी राजा चांगलाच सुखावला
रायगडमध्ये पावसाची गर्जना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, माणगाव या भागांत पाऊस सुरु आहे. हा पाऊस भात पेरणीसाठी लाभदायक ठरणार असल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. तळकोकणात मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कोकणातील शेतकरी राजा, मात्र चांगलाच सुखावला आहे. रायगड जिल्ह्यात देखील आजपासुन पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी राजा चांगलाच सुखावला आहे.
विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
रत्नागिरी जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवसाकरिता विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. सर्वांनी सतर्क रहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तासात रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून सतर्क राहण्याच्या नागरीकांना सूचना देण्यात आल्या आहेत. 30 ते 40 किमी प्रतीतास वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जोरदार पावसाची हजेरी
सोलापूर जिल्ह्यातील नरखेड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मलिकपेठ, हिंगणी, बोपले या भागातील कोरड्याठाक पडलेल्या शेतांचे बांध फुटून पाणी वाहू लागलं आहे. दुष्काळसदृश्य भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजाला दिलासा मिळाला आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. आज संध्याकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील कुशीत असलेल्या कोटबांधनी परिसरात तुफान पाऊस सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. परिसरात आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. दमदार पावसामुळे सातपुड्यातील शेतकऱ्यांच्या शेती कामांना वेग आला आहे.
डाळिंब बागेत साचलं पाणी
नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी येथील डाळिंब बागेत पाणी साचले आहे. पहिल्याच पावसाने दिंडोरीत पूर आला आहे. नदीनाल्यांना पूर आल्याने शेतकरी सुखावला आहे. आंबे दिंडोरी येथील डाळिंब बागेत पुराचे पाणी साचलं आहे. बागेतून पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्याचं प्रयत्न सुरु आहेत. तासभराच्या पावसाने दिंडोरीत 1.7mm इतक्या पाऊसाची नोंद झाली आहे.
गोंदियात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
गोंदिया जिल्ह्यात पावसाची हजेरी लागल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा दिला आहे. 3 जूनला नवतपा संपला तरी पूर्व विदर्भात उन्हाचा पारा सातत्याने 40 च्या वर होता. त्यामुळे प्रचंड उकाळा जाणवत होता. अशातच आज सायंकाळी गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.