Maharashtra Weather Rain Updates: राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने (Maharashtra Weather) दिला आहे. उत्तर कोकणात मागील दोन-तीन दिवसांत पावसाचे धुमशान पाहायला मिळत असून आज देखील पालघर आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी (Palghar Thane Rain News) करण्यात आला आहे. सोबतच, रायगडमध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा असून वाऱ्यांचा वेग ताशी 70 किमी पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत देखील मुसळधार पावसाचा जोर (Mumbai Rain) कायम राहणार आहे. सोबतच, वाऱ्यांचा वेग देखील ताशी 70 किमीपर्यंत जाऊ शकतो. पुण्यातील घाट परिसरात आज अतिवृष्टीची शक्यता असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच, नाशिक आणि साताऱ्यातील घाट परिसरात देखील उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा देऊ केला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर ओसरताना दिसेल. पश्चिम विदर्भ मुसळधार पावसाचा जोर आज बघायला मिळू शकतो. यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अमरावती आणि अकोल्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून विजांसह पावसाचा अंदाज या जिल्ह्यांतील काही भागात वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Rain Updates)
भारतीय हवामान विभागाची महत्वाची माहिती- (IMD Maharashtra Weather)
पालघर आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या पालघर परिसरात चक्रीय परिस्थिती (Cyclonic Circulation) निर्माण झाली असून मान्सूनही सक्रिय आहे. त्यामुळे या भागात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम गुजरातच्या काही भागांवरही होत असून, तेथे पुढील 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, घाटमाथा आणि डोंगराळ भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अल्प कालावधीत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद का होतेय? (Why is heavy rainfall being recorded within a short period?)
दरम्यान, अल्प कालावधीत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होत आहे. यामागे अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामध्ये वातावरणातील बदल, मान्सूनच्या प्रणालींमधील बदल, एल-नीनो/ला-नीना यांसारख्या हवामान घटकांचा प्रभाव तसेच वाढते प्रदूषण यांचा समावेश असल्याचे भारतीय हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी सांगितले.
नाशिकमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत- (Nashik Rain News)
नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी जनजीवन विस्कळीत झाले. शहरात गेल्या चोवीस तासांत 132 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गोदावरी नदीने प्रथमच धोक्याची पातळी ओलांडल्याने यंदाच्या वर्षातील पहिल्या पुराची अनुभूती नाशिककरांना मिळाली. रामसेतू पूल पाण्याखाली गेला आहे.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान- (Palghar Rain News)
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं असून सूर्या आणि वैतरणा नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे.त्यामुळे नदी काठावरील गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झालं आहे.डहाणू तालुक्यातील उर्से साये येथील कॉलनी पाडा पूर्ण पने पाण्याखाली गेला असून येथील सर्व नागरिक आपल घरदार सोडून बाहेर आहेत तर दहा ते पंधरा नागरिक दाभाडी बेटा मध्ये अडकून पडले आहेत.सध्या या ठिकाणी एबीपी माझा ने मदत कार्य सुरू केलं आहे.नागरिकांना आहाराची व्यवस्था केली आहे.
वसई-विरारमध्ये पावसाची विश्रांती; गाला नगरमध्ये तिसऱ्या दिवशीही पाणी कायम- (Vasai Virar Rain News)
वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात काल सायंकाळपासून मुसळधार पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. अधूनमधून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी शहरातील बहुतांश भागातील साचलेले पाणी ओसरले आहे. सध्या इतर कोणत्याही भागात पाणी साचलेले नसल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, नालासोपारा पूर्वेतील गाला नगर परिसरात परिस्थिती अद्यापही गंभीर आहे. येथे सलग तिसऱ्या दिवशीही रस्त्यावर पाणी साचलेले असून परिसरातील भाजी मार्केटमधील अनेक भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या अजूनही पाण्याखाली आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, विद्यार्थी आणि कामावर निघालेल्या नागरिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील काही तासांत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या परिसरात ढगाळ वातावरण असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू असून कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही. तसेच, वसई-विरारमधील सर्व शाळा नियमितपणे सुरू असून विद्यार्थ्यांची उपस्थितीही नेहमीप्रमाणे आहे.
