Maharashtra Weather :  राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. राज्याच्या काही भागात पूर्वमोसमी पावसाला (Rain)  सुरुवात झाली आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रात (Maharashtra) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 22 मे रोजी कर्नाटक जवळ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 19 मे ते 25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 17 ते 20 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, काही भागात अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 17 ते 20 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढला

नांदेडमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्री नांदेडला अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. त्यानंतर आज देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने सखल भागात पाणी साचल्याने मनपाचे पितळ उघडे पडलं आहे.

परभणीसह वीड जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस 

परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तीन दिवसानंतर पुन्हा एकदा परभणी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये आज सायंकाळच्या सुमारास वादळी वारे विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परभणीसह मानवत गंगाखेड पूर्णा तालुक्यात जोरदार वादळी वारे विजा आणि पाऊस झाला आहे. ज्यामुळं वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. मानवत तालुक्यात तर पावसाचा जोर एवढा होता की मोठ्या प्रमाणावर शेतामध्ये पाणी साचले आहे. बीड तालुक्यातील कुटेवाडी शिवारात झालेल्या पावसाने 25 एकर क्षेत्रावरील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागील चार दिवसांपासून सतत पावसाची हजेरी आहे. याचा परिणाम काढणीला आलेल्या पिकांवर पाहायला मिळतोय. कांद्यासह उन्हाळी ज्वारीचे देखील पावसात प्रचंड नुकसान झालंय. पंचनामे करून मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

पूर्वमोसमी पावसाचा जोर वाढला, अनेक भागात वादळी वाऱ्यासह वरुणराजाची जोरदार हजेरी, काही भागात पिकांना फटका