Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं ढगाळ वातावरण आहे तर कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस देखील पडत आहे. सध्याच्या वातावरणीय बदलानुसार 7 जानेवारीपर्यंत मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. 


विदर्भ मराठवाड्यात  देखील ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. आज आणि उद्यापर्यंतच हे वातावरण टिकून राहू शकेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे 16 डिग्री से. ग्रेड आणि दुपारचे कमाल तापमान 30 डिग्री से. ग्रेड  दरम्यान जाणवत आहे. पहाटेचे किमान तापमान सध्या त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा 4 डिग्री से. ग्रेडअधिक आहे. तर दुपारचे कमाल तापमान सरासरीच्या पातळीत आहे. ही दोन्हीही तापमाने रविवार 7 जानेवारीपर्यंत ह्याच पातळीत राहण्याची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.


महाराष्ट्राबरोबरच मुंबईतही ढगाळ वातावरण


मुंबईसह कोकणात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे 20 डिग्री से. ग्रेड आणि दुपारचे कमाल तापमान 30 ते 32 डिग्री से. ग्रेड  दरम्यान जाणवत आहे. तेथील ही दोन्हीही तापमाने सध्या त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा 2 डिग्री से. ग्रेडने अधिक आहे. ही दोन्हीही तापमाने रविवार 7 जानेवारीपर्यंत ह्याच पातळीत राहण्याची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. उत्तर भारतात काही भागात सध्या बर्षवृष्टी होत आहे. याचा परिणाम म्हणून अधित थंड वारे वाहत आहे. या वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. विशेषत मुंबईत थंड वारे येत आहे. त्यामुळं मुंबईसह राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.



दरम्यान, ढगाळ वातावरणामुळं कमी सूर्यप्रकाश आणि समुद्रसपाटीमुळं मुंबईत सध्य:स्थितित असलेला हवेचा उच्चं दाब आणि त्यात मुंबईतील धुरयुक्त प्रदूषित शांत हवा ह्या तिघांच्या एकत्रित परिणामातून जमिनीलगतच धुरयुक्त धुक्याचे  मळभ सध्या मुंबईत  जाणवत आहे. मुंबईत हे वातावरण कदाचित पुढील तीन दिवस म्हणजे रविवार 7 जानेवारी पर्यंत टिकून राहण्याची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Weather Update : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी किती पडणार? काय सांगतो हवामान विभागाचा अंदाज