Maharashtra weather update:  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली.  आज अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना पुन्हा एकदा जोरदार पाऊस बरसणार आहे.  मुंबई ठाण्यासह पुणे घाटमाथ्यावरही पावसाचे अलर्ट हवामान विभागाने दिले आहेत. उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा जोर आज अधिक राहणार असून पालघर, नाशिक घाटमाथ्यासह धुळे ,नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

Continues below advertisement

हवामान विभागाचा इशारा काय ?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा मध्यप्रदेश व पूर्व राजस्थान भागाकडे सक्रिय झाला आहे . चक्राकार वाऱ्यांची स्थिती अरबी समुद्राच्या ईशान्य भागाला जोडून गुजरात किनारपट्टी भागात सक्रीय असून या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे .परिणामी मध्य महाराष्ट्र कोकण व गोवा भागात मुसळधार त्यातील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .यावेळी वाऱ्यांचा वेग 45 ते 55 किलोमीटर प्रतितास राहणार असल्याचं सांगण्यात आलंय . पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून विदर्भात व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे .उर्वरित ठिकाणी कोणतेही इशारे देण्यात आलेले नाहीत .

आज सकाळपासून रायगड, ठाणे, नंदुरबार, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे व पुण्यात पावसाची हजेरी लागली आहे . बाप्पाला निरोप देताना  पुण्यात अनेक ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे .

Continues below advertisement

कोणत्या भागात पावसाचे इशारे ?

6 सप्टेंबर : मुंबई ठाणे रायगड नाशिक जळगाव तसेच पुणे घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे .तर पालघर धुळे नंदुरबार व नाशिक घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय . मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी लागणार असल्याचं सांगण्यात आलंय .

7 सप्टेंबर : पालघर, नाशिकपुणे घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड व लातूर जिल्ह्याला हलक्या पावसाची शक्यता आहे .

8 सप्टेंबर : विदर्भात अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड व लातूर जिल्ह्याला हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

9 सप्टेंबर : बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्याला हलक्या पावसाची शक्‍यता आहे .

महाराष्ट्रात अतिवृष्टीचा 29 जिल्ह्यांना फटका

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात झालेला मुसळधार पावसामुळे 29 जिल्ह्यांमधील 14.44 लाख हेक्टर जमीन वरील पिकांचे नुकसान झाले आहे अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी दिली . 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे 191 तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला .जात 654 महसूल मंडळांमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले .12 जिल्ह्यांमध्ये दहा हजार हेक्टर पेक्षा अधिक जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले .

दिल्ली जम्मू काश्मीरमध्ये तुफान पाऊस

उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून अनेक राज्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती आहे .जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात मुसळधार पाऊस पूर आणि भूस्खलनामुळे 283 घरांची नुकसान झाले असून 950 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे .

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात बियास नदीतून येणाऱ्या पाण्यामुळे पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे .दिल्लीत यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .अनेक गावांचा संपर्क तुटला आहे .